नवी दिल्ली – खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले. जगभरातील मोठ्या देशांनी याची दखल घेतली आहे. यु ट्यूबने देखील समोर येत अशा यु ट्यूब चॅनल्सला ब्लॉक केले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत यु ट्यूब चॅनल्स आणि वेबसाइट्सवर बंदी घातली होती. आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि युट्यूबवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिला.
गुप्तचर संस्थांशी समन्वय करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवण्याचा ठपका ठेवत डिसेंबरमध्ये यु ट्यूब चॅनल्स आणि वेबसाइट्सवर बंदी घातली होती. यातून समाजात फूट पाडणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर भविष्यात देखील कारवाई सुरूच राहिल, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.
बंदी घातलेले यु ट्यूब चॅनल्स आणि वेबसाइट्स पाकिस्तानमधून चालवले जात होते. ते भारतासंबंधी संवेदनशील विषयांवर खोटी माहिती पसरवत होते. या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर काश्मीर, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुह, राम मंदीर, जनरल बिपीन रावत इत्यादी विषयांवर विभाजनकारी माहिती पसरवली जात होती.