कराड – कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमण्याबाबत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे एक पत्र समाज माध्यमांवर फिरत आहे. ही बातमी खरी असल्यास हा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय असू शकेल. तसेच दहा खाजगी कंपन्यांमार्फत 70 हजार नोकरभरती करण्याचा सरकारने जीआर काढला आहे. सरकारचा चाललेला हा कारभार अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असून याविरोधात सर्वांनी एकत्र उठाव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सवादे, ता. कराड येथे आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 3 कोटी 36 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उदघाट्नप्रसंगी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, अजितराव पाटील-चिखलीकर, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, माजी जि.प. सदस्य शंकरराव खबाले, नरेंद्र पाटील, नानासाहेब पाटील, बंडानाना जगताप, इंद्रजित चव्हाण, धनाजी थोरात, मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे सचिव बाळासाहेब थोरात, उद्योजक वसंतराव चव्हाण, सोसायटी चेअरमन बाजीराव थोरात, सवादेच्या सरपंच जयश्री कदम, माजी सरपंच लक्ष्मी सुतार, माजी उपसरपंच पुजाराणी थोरात आदींसह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, नेहरूंनी-इंदिरा गांधींनी लोकशाहीचा पाया भक्कम केला. सरकारी संस्था उभारून देश सक्षम केला. इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पण, तोच आपला देश आज धार्मिक ध्रुवीकरणात अडकला आहे. भाजपमध्ये गेलेले लोक त्यांचा भ्रष्टाचार धुतला जाण्यासाठी गेले असून जनतेचा लुटलेला पैसा पचवण्याचे काम भाजपमध्ये गेल्यावर होत आहे. साम-दाम-दंड-भेदाचा वापर करत भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांच्यावरील आरोप धुवून टाकण्याचे राजकारण कुणालाही अपेक्षित नव्हते. इतका कधीही सत्तेचा गैरवापर झाला नाही, तो आता केला जात आहे.
उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांनी मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विचार करीत त्यांना संरक्षण देऊन मतदारसंघ आबाधित ठेवला. या मतदारसंघाने जो विचार जपला. तो विचार जपण्याचा प्रयत्न पृथ्वीराज बाबा कसोशीने करत असून त्यांना आपण साथ देण्याची गरज आहे. प्रास्ताविक सचिन थोरात यांनी केले. सुरेश साठे यांनी आभार मानले.