नवी दिल्ली : काँग्रेसची कन्याकुमारीतून सुरु झालेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या उत्तरप्रदेशमध्ये पोहचली आहे. दिल्लीत यात्रा पोहचल्यानंतर ८ दिवसांची विश्रांती घेण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारपासून पुन्हा एका या यात्रेला सुरुवात झाली आहे. ‘भारत जोडो यात्रा’ उत्तरप्रदेशमधील गाझियाबादमध्ये पोहचल्यावर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी याचे स्वागत केले. त्यातच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नात्यातील निस्वार्थ प्रेमाचा एक गोड व्हिडीओ समोर आला आहे.
‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून प्रियंका गांधी चालताना दिसत आहेत. अशात भारतीय युवक काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
भाई बहन का अटूट प्रेम ❤️ pic.twitter.com/cAyNqKts6N
— Indian Youth Congress (@IYC) January 3, 2023
त्यावर ‘भावा बहिणीचं अतूट प्रेम’ असं कॅप्शन लिहले आहे. भावा बहिणींच्या नात्यातील हा प्रेमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना प्रियंका गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “राहुल गांधींचा मला गर्व आहे. सरकारने राहुल गांधींची प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरीही राहुल गांधी घाबरले नाही,” असे प्रियंका गांधी म्हणाल्या.