सातारा – सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त करण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली आहे. शहरात ठिकठिकाणी लावलेले तीन मोठे फ्लेक्स बोर्ड गुरुवारी जप्त करण्यात आले. रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्या दहा विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.
सातारा शहरात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जागा दिसेल, तेथे विनापरवाना फ्लेक्स लावले जात असल्याने शहर बकाल होत आहे. त्यामुळे पालिकेने फुकट्या जाहिरातदारांवर कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने गुरुवारी तीन फ्लेक्स जप्त केले. फूटपाथ व रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले.
शहरातील बाजार समितीच्या आवारातील फूटपाथवर बसलेल्या विक्रेत्यांना हटविताना काही जणांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी एका विक्रेत्याने दिली. त्यांचा विरोध झुगारून अतिक्रमण विभागाने कारवाई केली. कारवाईच्या धास्तीने अनेकांनी आधीच गाशा गुंडाळला. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती प्रशांत निकम यांनी दिली.