मुंबई, दि. 11 – मराठी भाषा विभागाचे वर्ष 2021 चे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सर्वात प्रतिष्ठेचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत आणि समीक्षक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. पठारे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, विविध पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्यपद भूषविलेले आहे.
प्रकाशनसंस्थेसाठीचा श्री. पु. भागवत स्मृती पुरस्कार श्रीरामपूर येथील सुमती लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनला जाहीर झाला आहे. या प्रकाशन संस्थेद्वारे महाराष्ट्रात आणि गोव्यात मिळून अनेक पुस्तक प्रदर्शने भरविली आहेत. तसेच ही संस्था दरवर्षी “शब्दालय’ हा दिवाळी अंक प्रकाशित करते.
मराठी भाषा अभ्यासक हा विशेष पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ व संजय जनार्दन भगत यांना जाहीर झाला आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांना जाहीर करण्यात आले आहे. हे पुरस्कार 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी केली.
मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात शासनास विशेष आनंद होत असून मराठी भाषा गौरव दिनी हे पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, असेही देसाई यांनी सांगितले. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा उपस्थित होत्या.