– संतोष वळसे पाटील
मंचर (प्रतिनिधी) – महामार्गावर धावणाऱ्या लाल परीची म्हणजे एस टी बसची मागची दोन्ही चाके निखळल्याची घटना मंचर जवळील शेवाळवाडी येथे घडली. उर्वरित चार चाकावर बस काही सेकंद धावली. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी सुखरुप बचावले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परेल एस टी आगाराची परेल नारायणगाव एस टी बस क्रमांक एम एच बी एल ३६१८ पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या मंचर जवळील शेवाळवाडी परिसरात लालपरीची ड्रायव्हर साईटच्या मागील असलेल्या एका बाजूची दोन्ही चाके अचानक निखळली.
त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. बस तिरकी होऊन रस्त्यावरच तिरपी धावत गेली. या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि बसमध्ये आरडाओरडा सुरू झाला. या घटनेने प्रवाशांच्या काळजाचे पाणीच पाणी यावेळी झाल्याचे पहायला मिळाले.
दोन्ही चाकं निघून गेल्यावर बस चार चाकांवर घासत पुढे जात असल्याचे पहायला मिळत आहे. घासत गेल्यामुळे ठिणग्या उडत होत्या. मात्र चालकाच्या हे लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
राजगुरुनगर एस टी आगाराच्या दुरस्ती पथकाने येऊन एस टी बस दुरुस्त केल्याची माहिती मंचर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक एम .डी .शिंदे यांनी सांगितले .