श्रीनगर, – जम्मू-काश्मीरमधील चकमकीत बुधवारी सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित संघटनेचे सदस्य होते. त्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले. तर, आणखी दोन जवान जखमी झाले.
शोपियॉं जिल्ह्यात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनी शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. त्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले.
चकमकीत तीन जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना एका जवानाचे निधन झाले. दरम्यान, मारला गेलेला एक दहशतवादी टार्गेट किलिंगमध्ये सामील असल्याचे स्पष्ट झाले.
दहशतवाद्यांनी चालू महिन्यात टार्गेट किलिंगचे सत्र आरंभले आहे. त्यांच्याकडून परप्रांतीयांना आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे तशाप्रकारच्या हल्ल्यांत सामील असणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा महत्वाची घडामोड मानली जात आहे.