दुर्दैवी घटना | तब्बल 1 टन काचा अंगावर पडल्या; टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

शिरोली नागाव फाट्यावरील गोडाऊनमधील घटना

कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिरोली एमआयडीसी हद्दीतील शिरोली नागाव फाट्यावर काच विक्रीच्या गोडाऊनमध्ये क्रेनचा बेल्ट तुटून एक टन काचा अंगावर पडल्याने टेम्पो चालक ठार झाला. संदीप खरोशे (वय ३१, रा. नृसिंह कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड) असे दुर्दैवी टेम्पो चालकाचे नाव आहे. शिरोली एमआयडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे.

या घटनेची हकीकत अशी की शिरोली नागाव फाट्यावर मोमीन यांचे मोठे काचेचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून दुकानदार आणि ग्राहकांना काचेचा पुरवठा केला जातो. काचा जाड असल्याने काच भरण्यासाठी गोडाऊनमध्ये क्रेन बसवण्यात आली आहे.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संदीप खरोशे काचा भरण्यासाठी टेंपो घेऊन मोमीन यांच्या गोडाऊनमध्ये गेले. यावेळी काचा टेम्पोमध्ये भरत असताना काचा वाहून नेणारा क्रेनचा बेल्ट तुटला आणि काचा चालक खरोशे यांच्या अंगावर पडल्या. खरोशे काचेच्या खाली चिरडले गेले. यावेळी गोडाऊनमध्ये असणाऱ्या कामगारांनी काचा फोडून जखमी खरोशेंना बाहेर काढले आणि सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच खरोशेंचे नातलग मोमीन यांच्या गोडाऊनमध्ये गेले असता ते बंद होते. खरोशे यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केल्याची माहिती त्यांना मिळाल्यावर त्यांनी तिकडे धाव घेतली. तिथे खरोशे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला.

दरम्यान, ज्या गोडाऊनमध्ये अपघाताची घटना घडली तेथील मालक व कर्मचारी सीपीआरमधून पळून गेल्याचे समजताच नातलगांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी गोडाऊन चालकाच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी टेम्पोमध्ये एका बाजूच्या काचा अंगावर पडल्याने खरोसा यांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.