पुणे – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दोन हजारांची नोट दि. 30 सप्टेंबरपर्यंतच चलनात वैध राहणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बहुतांश ठिकाणी गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण आहे. तर, काही ग्राहकांनी आता घरातील नोटा बाहेर काढत ती “कटवण्याचा’ प्रयत्न चालवला आहे. या सर्व प्रकारांमुळे हमरीतुमरी आणि वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. तर, व्यापारी आणि बहुतांश व्यावसायिकांनीही रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाबाबत स्पष्टता नसल्याची बाजू मांडली आहे. याबाबत “प्रभात’ने पेट्रोलपंपासह अन्य ठिकाणी पाहणी केली. तर, काही जणांनी याबाबत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
व्यापारी संभ्रमावस्थेत
पुणे – व्यापाऱ्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत भरल्यास त्यांची चौकशी तर होणार का नाही, याबाबत रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे या नोटा स्वीकारण्यावरून व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. स्वीकारल्या तर किती? याबाबतही स्पष्टता नाही. बंदीनंतर बाजारात दोन हजारांच्या नोटा येण्याचे प्रमाण वाढले आहे, हे पाहता याबाबत स्पष्टता हवी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही कमी प्रमाणात असल्यास स्वीकारल्या जातात. मात्र, जास्त नोटा असल्यास स्वीकारण्यावरून व्यापाऱ्यांमध्ये भीती असल्याचे दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांनी किती नोटा स्वीकाराव्या, खात्यामध्ये भरल्यास चौकशी होणार का नाही, याचे स्पष्टीकरण रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे जास्त नोटा भरल्यास आपली चौकशी होईल, विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे निर्णयाबाबत स्पष्टता हवी. तरीही, कमी प्रमाणात असल्यास या नोटा स्वीकारल्या जात आहेत.
– राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर
व्यापारी दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. नागरिक 200 ते 300 रुपयांची खरेदी करून दोन हजार रुपयांची नोट देत आहेत. प्रत्येकाला उर्वरित रक्कम देण्यास व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. काही दुकानदारांनी तर “आमच्याकडे खरेदी करा, आम्ही दोन हजारची नोट स्वीकारतो’ अशा जाहिराती सोशल मीडियावर केल्या आहेत.
– महेंद्र पितळीया, सचिव,पुणे व्यापारी महासंघ
फळे, भाजीपाला विभागात किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा नसतात. तर, मोठे ग्राहक ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करतात. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही आल्यानंतर स्वीकारतो आणि सरकारच्या सूचनेनुसार बॅंकेत भरतो.
– विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन
बॅंकेतील रांग टाळण्यासाठी केला जातोय खटाटोप
दोन हजारांच्या नोटा बाजारपेठ तसेच पेट्रोल पंपावर नाकारल्या जात असतानाच दुसऱ्या बाजूला किरकोळ बाजारात या नोटा येण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. ही नोट 30 सप्टेंबरपर्यंत वैध असली, तरी “आरबीआय’नेच ती बॅंकेतून बदलून घेण्याची सूचना केली आहे. तर, दिवसाला जास्तीत जास्त 10 नोटा बदलून मिळणार आहेत. त्यामुळे, नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकेतील रांगा तसेच पुढील कटकटी टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी 100-200 रुपयांच्या खरेदीसाठी दोन हजार रुपयांच्या नोटा अचानक बाहेर काढल्या जात आहेत. अशा वेळी सुट्या पैशांचे कारण देत व्यावसायिकही दोन हजाराची नोट टाळत असून, ते आपल्याकडील नोटा बॅंकेत भरू शकतात. मात्र, तरीही ते नकार देत आहेत.
बॅंकांचाही आडमुठेपणा
मंगळवारपासून बॅंकांमध्ये या दोन हजारांच्या नोटा अन्य चलनी रुपात बदलून देण्यात येणार आहेत. तरीही, सोमवारीच अनेक नागरिकांनी बॅंकांमध्ये नोटा बदलण्यासाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. तर, काही जण फक्त चौकशीसाठी आले होते. यावेळी काही ठिकाणी तुमचे खाते असेल त्याच बॅंकेत जा असे सांगण्यात येत होते. तर, काही बॅंकांमध्ये याबाबत माहिती पत्रकेही लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अद्यापही नागरिकांमध्ये याबाबत पुरेशी जागृती झालेली नसल्याचे दिसून आले.
ग्राहक-व्यापाऱ्यांमध्ये वाद
पुणे – दोन हजारांची नोट चलनातून काढण्याचा निर्णय झाल्यानंतर शनिवारपासून (दि. 21) शहरातील व्यापारी, दुकानदार आणि उपाहारगृह चालक दोन हजारांची नोट स्वीकारण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्राहक त्रस्त झाले आहेत. याचे रुपांतर आता वादांमध्ये होत आहे.
दरम्यान, “दोन हजारांची नोट प्रत्येकाकडे नसते. पाचशे रुपयांच्या तुलनेत दोन हजारांच्या नोटा सामान्यांकडे उपलब्ध नसतात. तरीही ज्यांच्याकडे आहेत, ते देण्याचा प्रयत्न करणार. दोन हजारांची नोट चलनातून बाद केल्यानंतर गोंधळ उडणार असून दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे,’ असे भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.
मी सदाशिव पेठेतील
एका औषध विक्री दुकानात खरेदीसाठी गेलो होते. तेथून साडेआठशे रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या. ओैषध दुकानदारास दोन हजारांची नोट दिली, तेव्हा दुकानदाराने नोट स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे आमच्यात शाब्दिक देवाणघेवाण झाली.
– ऍड. अरूण लंबुगोळ, पुणे
दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय म्हणजे अघोषित नोटबंदी आहे. नोटबंदीमुळे व्यापार, उद्योगावर परिणाम झाला होता. शनिवारपासून अनेकांनी दोन हजारांची नोट स्वीकारण्यास नकार दिला जात आहे.
– प्रकाश ढमढेरे, किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी