पुणे -रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांची नोट 30 सप्टेंबर व्यवहारात वैध राहणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या आदेशाला शहरातील पेट्रोल पंप चालकांनी हरताळ फासला आहे. ही दोन हजारांची नोट घेण्यास त्यांच्याकडून नकार दिला जात आहे. तर, काही ठिकाणी नोट घेतली तरी दोन हजार रुपयांचेच पेट्रोल, डीझेल भरणे बंधनकारक केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कोंडी झाली आहे. अनेक पंपावर चक्क याचे स्टिकर लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा गोंधळ थांबवावा, अथवा पैसे न घेणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
नोट स्वीकारण्यास थेट नकार
शहरात सोमवारी जवळपास सर्वच पंपावर दोन हजार रुपयांची नोट घेण्यात येत नव्हती. पूर्वी अनेकदा नागरिक हव्या त्या रकमेचे पेट्रोल भरत होते. त्यानंतर उरलेले पैसे पंपचालक परत करत होते. मात्र, हा निर्णय जाहीर झाल्यानंतर या नोटाच घेण्यात येत नाहीत. तसेच, पेट्रोल भरण्यापूर्वी आधीच नोट घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांची कोंडी होत आहे. विशेत: दुचाकीचालक अनेकदा 200 ते 500 रुपयांचे पेट्रोल भरतात. अशा वेळी ही नोट स्वीकारली जात नसल्याचे पंपावरच वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
…गरज नसतानाही!
दोन हजारांची नोट पेट्रोल पंपावर चालवण्यासाठी अनेकांना गरज नसतानाही तेवढ्या रकमेचे पेट्रोल भरावे लागत आहे. तर, नागरिक हजार आणि पंधराशे रुपयांचे पेट्रोल भरण्यास तयार असले, तरी पंपचालक त्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
कोणत्याही पेट्रोल पंपचालकांनी अशा प्रकारे दोन हजार रुपयांची नोट नाकारू नये. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा चलनात वैध ठरविल्या आहेत. त्यामुळे त्या स्वीकारणे बंधनकारकच आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित पंप चालकांवर कारवाई करू. तसेच नागरिकांना काही समस्या असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.
– अली दारुवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन