- भूयारी मार्गात घुसलेल्या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
वडगाव मावळ – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीस्वाराचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट भुयारी मार्गात जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. वडगाव येथे न्यू इंग्लिश स्कूलसमोर बुधवारी (दि. 14) सकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली.
चिरण बहादूर गिरी (वय 26), पुरण मोहनसिंग गिरी (वय 33, दोघेही रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळ नेपाळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत संतोष सूर्यवंशी (रा. आंबेडकर कॉलनी, वडगाव मावळ) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली.
पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सूर्यवंशी बुधवारी सकाळी “मॉर्निग वॉक’साठी घराबाहेर पडले. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याने चालले होते. न्यू इंग्लिश स्कूलसमोर भुयारी मार्गजवळ विश्रांतीसाठी थांबले. त्यांनी भुयारी मार्गात डोकावले. त्यावेळी त्यांना पांढऱ्या रंगाची दुचाकी पडलेली दिसली. चिरण गिरी व पुरण गिरी बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले.
या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना दिली. त्यावर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसाई, संतोष चामे, पोलीस हवालदार संतोष माने, गणेश तावरे, मनोज कदम आदींनी धाव घेतली. गंभीर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र उपचारापूर्वीच चिरण आणि पुरण यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. वामन गेंगजे यांनी केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पोलीस हवालदार संतोष माने तपास करीत आहेत. पुरण गिरी हा विक्की बांबू हाऊस याठिकाणी काम करत होता. चिरण गिरी हा मावळ लॅण्ड येथे वॉचमन म्हणून काम करीत होता.