गोंदवले (प्रतिनिधी) – गोंदवले बुद्रुक, ता. माण येथील 75 वर्षांचा वृद्ध आणि 21 वर्षांची तरुणी यांचा अहवाल काल (दि. 18) रात्री पॉझिटिव्ह आला. बाधित रुग्ण सापडलेल्या परिसरापासून एक किलोमीटरचा परिसर प्रशासनाने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
गोंदवले बुद्रुक येथील एका कुटुंबातील सहा व्यक्ती सोलापूर जिल्ह्यातील मळवली येथे एका लग्न समारंभाला गेल्या होत्या. तिथे दोन दिवस थांबून लग्न समारंभ उरकल्यावर हे सहा जण गावात परत आले. तेथे ते स्वतःच्या शिवारात गेले असता पावसात भिजल्याने चार सदस्यांना कणकणी आली होती. त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले, तरी त्रास कमी न झाल्याने आरोग्य उपकेंद्रात उपचार घेतले. तेथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले; परंतु 75 वर्षांचा वृद्ध व 21 वर्षांच्या युवतीला त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी दाखल करून स्वॅब घेण्यात आले. त्यांचे अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आले.
या कुटुंबातील व्यक्तींच्या सान्निध्यात आलेल्या व लग्नाला गेलेल्या सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.संबंधित कुटुंब बाजार पटांगणाच्या शेजारी राहायला असून तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. सपोनि राजकुमार भुजबळ, महसूल विभागाचे लिपिक तुषार पोळ, तलाठी इनामदार, सरपंच, पोलीस पाटील व आरोग्यसेवकांनी रविवारी सकाळी गावाला भेट दिली. गोंदवलेत आतापर्यंत एकूण नऊ रुग्ण आढळल्याने गावकरी चिंतेत आहेत.