गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यात एक 62 वर्षीय वृद्ध गृहस्थ असून एक 7 वर्ष वयाच्या मुलाचा समावेश आहे. या जिल्ह्यातील अरमोरी तालुक्यातील देलोधा गावात 62 वर्षीय इसमावर हल्ला करून वाघाने त्यांना मंगळवारी ठार मारले. हा इसम आपल्या शेतात मश्रुमची लागवड करण्यासाठी गेला होता.
तेथून परतत असताना हा प्रकार घडला. त्याचा मृतदेह वाघाने घटनास्थळापासून दूर लांब जंगलात नेल्याचे आढळून आले. दुसरी घटना बुधवारी याच जिल्ह्यातील चामोसी तालुक्यातील मार्कंड जंगल भागात घडली. तेथे सात वर्षाच्या लहान मुलावर वाघाने झडप घालून त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच त्याचे आजोबा त्याच्या मदतीला धावले. त्यांनी कसेबसे वाघाला पळवून लावले पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता. हा मुलगा मृतावस्थेत आढळला.