मेलबर्न – ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आज दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. यामुळे दुर्घटनाग्रस्त झालेल्या एका हेलिकॉप्टरमधील प्रवासी जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. तर दुसरे हेलिकॉप्टर सुखरुप उतरण्यास यशस्वी झाले, असे क्वीन्सलॅन्ड प्रांताच्या पोलिसांनी सांगितले.
एकूण 13 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात पोहोचवले जात आहे, असे क्वीन्सलॅन्ड ऍन्ब्युलन्स सर्व्हिसेसने म्हटले आहे. मात्र या जखमींच्या स्वरुपाविषयी अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. या अपघातात कोणी मरण पावले का नाही, हे देखील समजू शकलेले नाही.
धडक झाल्यानंतर एक हेलिकॉप्टर समुद्रकिनाऱ्यावरील वाळूमध्ये पडले आणि उलटले होते. यामुळे हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आणि ते समुद्रकिनाऱ्यावर विखुरले. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोल्ड कोस्टवरील सी वर्ल्ड थीम पार्कवर हा अपघात झाला.
या अपघातानंतर येथील सी वर्ल्ड ड्राईव्ह बंद करण्यात आला. या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या कारणांचा तपास ऑस्ट्रेलियातील “ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरो’च्यावतीने करण्यात येते आहे.