वाघोलीत शिल्पा प्रॉपर्टीजच्या निष्काळजीपणा: प्रकरण दडपण्यामागे कोण सूत्रधार?
वाघोली (पुणे) – वाघोली – केसनंद (ता. हवेली) रोडवरील शिल्पा प्रॉपर्टीजमध्ये इमारत बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि.1) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दुसऱ्यादिवशी आई- वडिलांचे जबाब घेतले. मात्र, त्यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकार दडपण्यामागे कोण सूत्रधार आहे, याची चर्चा हवेली तालुक्यात सुरू झाली आहे.
संदीप विशाल थापा (वय 9), मनीषा टेकेंद्र थापा (वय 6), असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
लिनिया सोसायटी लेबर कॅम्पलगत शिल्पा प्रॉपर्टीज (गट नं. 884) यांच्या मालकीची मोकळी जागा आहे. जागेला पत्र्याचे शेड मारले असून एका ठिकाणी येण्यासाठी पत्रा काढून रस्ता ठेवला आहे. शेडबाहेर नेपाळ येथून आलेले कुटुंब राहते. तीन मुले खेळताना पत्र्याच्या शेडमधून मोकळ्या जागेत पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ आले. यावेळी मनीषा व संदीप ही दोन मुले पाण्यात पडली. हे दोघे पाण्यात पडल्याचे पाच वर्षांचा नवराज विशाल सुतार याने त्या मुलांच्या घरी येऊन सांगितले.
ऑफिस बॉय धर्मेश थापा याला हा प्रकार समजताच त्याने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांना पाण्याबाहेर काढून वाघोलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास राजेश कर्डिले करीत आहेत. शिल्पा प्रॉपर्टीजच्या संबधित मालकाशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.