नगर -तरूणाला निर्जनस्थळी नेऊन त्याच्या खुनाचा प्रयत्न करणारे दोघे एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. हर्षद गौतम गायकवाड (रा. दूध डेअरी चौक, वडगाव गुप्ता शिवार ता. नगर) व बाळु शंकर काळे (रा. चेतना कॉलनी, नवनागापुर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करण्यात आले आहे.
26 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास महेश बाबासाहेब आरू (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांना दोघांनी विळद शिवारातील निर्जनस्थळी नेले. मागील भांडणाच्या कारणावरून धारदार हत्याराने डोक्यात वार करून त्याचा खुनाचा प्रयत्न केला होता. जखमी आरू यांनी याप्रकरणी दि.27 सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हर्षद गौतम गायकवाड, बाळु शंकर काळे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून दोघे पसार होते. ते विळद बायपास येथे एका ठिकाणी असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विळद बायपास येथून दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड, उपनिरीक्षक दीपक पाठक, उपनिरीक्षक योगेश चाहेर, अंमलदार विष्णू भागवत, राजू सुद्रिक, महेश बोरूडे, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, सचिन हरदास तसेच मोबाईल सेलचे रिंकु मटेकर, राहुल गुड्डू, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान, हर्षद गायकवाड याच्या विरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, आर्म ऍक्ट कलमान्वये गुन्हे असून बाळू काळे विरोधात खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे.