नवी दिल्ली – भारताला अध्यक्षपद मिळालेल्या जी-20 समूहासह अन्य अनेक देशांचे प्रतिनिधी उद्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये येत आहेत. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी ही परिषद होणार आहे. किमान सहा ठिकाणी विविध विषयांवर होणाऱ्या चर्चासत्रांसह या सर्व ठिकाणी भारतातून पाहुण्यांना स्मृतिचिन्हं अर्थात मेमोरॅबिलिया खरेदी करण्यासाठी एक कॅटलॉग प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पैठणी साडी आणि कोल्हापुरी चपलांचा समावेश आहे.
यानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे की, भारत हा विविध संस्कृतींचा आणि परंपरांचा देश आहे आणि
या विविधतेची लक्षणीय अभिव्यक्ती देशाच्या समृद्धीमध्ये आढळू शकते. त्यामुळेच देशाच्या विविध प्रांतात असलेल्या पारंपरिक कला आणि हस्तकलेचा इतिहास मोठा आहे. हा शतकानुशतके देशाचा वारसा ग्रामीण भारताने आजही जपला आहे. क्लिष्ट कोरीव कामापासून ते भरतकाम, हस्तशिल्प म्हणजे देशाच्या ऐतिहासिक परंपरा आणि अभिमानाचा स्रोत आहे. लोक संस्कृती जपण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
जगभरातून आपण भारतात येत आहात आणि या देशाच्या 140 कोटी नागरिकांना आपले स्वागत करताना आनंद होत आहे. या आनंदाचे प्रतिक म्हणून आपण आमच्या राष्ट्राची ओळख म्हणून ही स्मृतिचिन्हे खरेदी करावीत आणि या परंपरागत कलांसाठी आपले जीवन वेचत असलेल्या कलाकारांना आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी.
ताग, कापूस, माती, चामडे, लाकूड अशा सर्वच नैसर्गिक वस्तूंपासून बनलेल्या या सजावटीच्या आणि नित्य वापराच्या वस्तू आपल्याला नक्की आवडतील. भारतीय कारागीर हस्तकला जिवंत ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांच्या भावी पिढ्यांसाठी आपले योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.
यामध्ये उत्तरेकडील फुलकारी, कलमकारी, कशिदाकारी; पूर्वेकडील चिकनकारी, मधुबनी; ईशान्येकडील हातमाग आणि पट्टचित्र; दक्षिणेकडील शंख-शिंपले कला, कांचीपुरम, तंजावर तर पश्चिमेकडील कच्छ-काठियावाडी, पैठणची पैठणी, कोल्हापुरी चपला आणि पाटण-पटोला अशा विविध ठिकाणच्या कलाकृतींचा, वस्तूंचा समावेश आहे. तसेच मध्य भारतातील बंधेज आणि चंदेरी कलेचाही समावेश आहे.
गीतेचीही माहिती देणार…
भारत आपला डिजिटल पराक्रम परदेशी प्रतिनिधींना दाखवेल. त्यामध्ये आधार आणि युपीआय सारखे तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म असतील. तसेच ‘गीता’ ऍपद्वारे अध्यात्मिक जीवन समजून घेण्याची संधी देण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारत मंडपममध्ये डिजिटल इंडिया एक्सपीरियंस झोन देखील स्थापित केला आहे. येथे परदेशी पाहुण्यांना एका खास ऍपद्वारे पवित्र ग्रंथ गीता आणि त्यातील तत्त्वज्ञान समजून घेण्याची संधी मिळणार आहे.