पुणे – मागील दोन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. शासनाने सुरुवातीस उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने मंगळवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदी मिनल कळसकर यांची नियुक्ती झाली आहे, तर शहर अन्न धान्य वितरण अधिकारीपदी दादासाहेब गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामती प्रांताधिकारी वैभव नावडकर, दौंड-पुरंदर प्रांताधिकारीपदी मिनाज मुल्ला, नोंदणी उपनिरिक्षकपदी अभिषेक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे आदेश महसूल विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी काढले आहेत.
आधी करोनाची परिस्थिती आणि मागील वर्षी मुख्यमंत्री यांनी बदल्यांना दिलेली स्थगिती यादरम्यान राज्यात झालेले सत्तांतर यामुळे बदलीस पात्र असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. अखेर आता महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यास सुरुवात झाली. मागील दोन वर्षात बदल्या न झाल्याने तसेच पुढील वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी हे पदसुध्दा मागील सहा महिन्यांपासून रिक्त होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे आहे. या पदावर नागपूर येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांची पुणे जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. तर किर्ती नलावडे यांची नियुक्ती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले संतोषकुमार देशमुख यांची सोलापूर येथे भूसंपादन अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे.
एक वर्षानंतर पूर्णवेळ अन्नधान्य वितरण अधिकारी
शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी हे पद मागील एक वर्षांपासून रिक्त होते. शहरातील गोरगरीब नागरिकांना रेशन दुकानांमधून सवलतीच्या तसेच मोफत धान्य वितरण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. मात्र मागील एक वर्षांपासून या पदाचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता. त्यामुळे शहराला पूर्णवेळ अन्नधान्य वितरण अधिकारी नेमण्याची मागणी होत होती. ती अखेर एक वर्षानंतर पूर्ण झाली आहे.