हैदराबाद : तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील भारतीय लष्करातील अधिकाऱ्याचा चीनी सैन्याशी झालेल्या धुमश्चक्रीत मृत्यू झाला. बिक्कूमल्ला संतोष बाबू (वय 37) असे या शहीद झालेल्या अधिकाऱ्याचे नाव. ते 16 व्या बिहा बटालीयनमध्ये कर्नल पदावर कार्यरत होते. भारत चीन सीमेवर ते गेली 18 महिने खडा पहारा देत होते.
काराकोंडा सैनिकी विद्यालयातून 1993 ते 2000 या कालावधीत शिक्षण घेतलेल्या बाबू यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलीटरी अकादमीतूनही प्रशिक्षण घेतले होते.
कर्नल संतोष यांची खरे तर हैदराबादला बदली झाली होती. पण देशव्यापी लॉकडाऊनमुळे ते सीमेवरील चौकीत तैनात राहीले. त्यांची पत्नी संतोषी आणि मलगा आणि मुलगी (अनिरूध्द आणि अभिग्ना) हे कुटुंबीय दिल्लीत वास्तव्यास असतात. त्यांची लष्करात 15 वर्ष सेवा झाली आहे. काश्मिरमध्ये पाकिस्तान सीमेवर ते 2007मध्ये कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांनी घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते.
संतोषी यांनी सांगितले की, त्यांच्या युनिट अधिकाऱ्याकडून फोनवर मला पतीच्या निधनाची माहिती देण्यात आली. सीमेवर सैन्यामध्ये झालेल्या संघर्षात सोमवारी रात्री ते कालव्यात पडले. त्यात ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले, असे सांगण्यात आले.
कर्नल संतोष यांची आई बी. मंजुळा म्हणाल्या, एक आई म्हणून मी कोसळुन गेलीय खरी. पण मला माझ्या मुलाच्या हौतात्म्याचा अभिमान आहे. मंगळवारी दुपारी ही दु:खद घटना आम्हाला कळवण्यात आली.
दरम्यान मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.