नाशिक – दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीजवळ पिकअप टेम्पोची धडक बसून 8 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टेम्पोची तोडफोड करत चालकाला मारहाण केली. मात्र वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
जोया सलीम शेख (वय 8) असे अपघातात मृत्यु झालेल्या चिमुकलीचं नावं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोया रस्त्यावरून जात असताना दिंडोरी रस्त्यावरील अवधूतवाडीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत जोया ही वाहनाच्या चाकाखाली आली.
यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र पंचवटी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून तातडीने चालकाला अटक केली. त्यानंतर जोयाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. चिमुकल्या जोयाच्या मृत्यूनंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.