नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनसीसीएफ या संस्थेने दिल्लीत रास्त दरात टोमॅटो विक्री सुरू केली आहे. राजधानीसह देशाच्या अनेक भागात टोमॅटोच्या किंमती शंभरीच्या पार गेल्याने लोकांकडून मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या संस्थेने खुल्या बाजारात टोमॅटो खरेदी करून दिल्लीत त्याची 90 रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू केली आहे.
टोमॅटोच्या किंमतीत मोठ्याप्रमाणावर वाढल्यानंतर केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांतील मंडईंमधून ताबडतोब त्याची खरेदी करण्याचे निर्देश दिले. देशाच्या काहीं भागात टोमॅटोच्या किंमती 150 ते 160 रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत. या आठवड्यात शुक्रवारपर्यंत टोमॅटोचा साठा किरकोळ विक्री केंद्रांद्वारे सवलतीच्या दरात दिल्ली क्षेत्रातील ग्राहकांना वितरित केला जाईल, असे एका अधिकृत निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.