राज्यातील शेतकरी कर्जमाफीचे नवे निकष जाहीर; अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफीच्या हालचाली सुरू केल्या असून जिल्हा बँकांकडून माहिती मागवली आहे. मात्र, ३० जून २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांचीच माहिती मागवण्यात आल्याने, २०२६ मध्ये थकबाकीदार होणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेय. सहकारी संस्थांचे अप्पर आयुक्त व विशेष निबंधक नागनाथ यगलेवाड यांनी मुंबई वगळता राज्यातील २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांतील नियमित परतफेड करणाऱ्या आणि थकबाकीदार अशा दोन गटांत माहिती संकलित करण्याचे आदेश दिलेत. राज्याचे माजी मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली उच्चाधिकार समिती गेल्या तीन महिन्यांपासून या कर्जमाफीचा अभ्यास करत आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यावर सरकारचा कल आहे. या अटींमुळे सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. महापालिका निवडणूकीत ७० उमेदवार बिनविरोध; राज ठाकरेंनी व्यक्त केले आश्चर्य महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ७० उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यात भाजपाने ४४ जागांसह आघाडी घेतली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २२ उमेदवार विजयी झालेत. यावर प्रतिक्रिया देताना मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या उभ्या आयुष्यात मी अशी निवडणूक कधीच पाहिली नाही. इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध होण्याची ही पहिलीच वेळ आहे.” दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने या बिनविरोध निवडींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उमेदवारांवर दबाव किंवा आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या विजयाची अधिकृत घोषणा केली जाणार नाही. येत्या १५ जानेवारीला मतदान असून १६ जानेवारीला अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. सातारा साहित्य संमेलनाला गालबोट; कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींना काळं फासलं साताऱ्यात सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आज खळबळजनक घटना घडली. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला संदीप जाधव नामक आंदोलकाने काळं फासलं. ही घटना व्यासपीठाजवळ घडली असून, काळं फासल्यानंतर आंदोलकाने ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा देत राष्ट्रगीतही म्हटले. हल्लेखोर रिपाइं कार्यकर्ता असल्याचा दावा केला जात असून, शाहूपुरी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. रसायनामुळे कुलकर्णी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी’ कादंबरीवरून संभाजी ब्रिगेडने आधीच संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता. या प्रकरामुळे साहित्य वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून संमेलन परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलीय. पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीत ठिणगी; रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांना इशारा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील संघर्ष टोकाला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. “अजित पवारांनी आपण मोदी आणि फडणवीसांच्या पक्षावर आरोप करत आहोत याचे भान ठेवावे; आम्ही आरोप सुरू केले तर त्यांना अडचणी येतील,” असा थेट इशारा चव्हाण यांनी दिला. दुसरीकडे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नाराजी व्यक्त करत, मित्रपक्षात मनभेद निर्माण होतील अशी विधाने टाळण्याचा सल्ला दिला आहे. तत्पूर्वी, ‘भाजपने सात वर्षांत महापालिका लुटली’ असा खळबळजनक आरोप अजित पवारांनी केला होता. महायुतीतील या ‘कलगीतुऱ्या’मुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. अमेरिका-वेनेझुएला संघर्ष पेटला; ट्रम्प यांचा राजधानी काराकासवर भीषण हल्ला अमेरिका आणि वेनेझुएला दरम्यानचा दशकांहून जुना वाद आता युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलायहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेझुएलाची राजधानी काराकासवर हवाई हल्ल्यांची पुष्टी केली असून, राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन देशाबाहेर नेल्याचा दावा केलाय. या कारवाईसाठी अमेरिकेने ‘अमली पदार्थ तस्करी’ आणि ‘मानवी हक्कांचे उल्लंघन’ ही कारणे पुढे केली आहेत. मात्र, या संघर्षाच्या मुळाशी वेनेझुएलाचा ३०३ अब्ज बॅरलचा अफाट तेल साठा असल्याचे मानले जाते. ट्रम्प प्रशासनाला मध्य-पूर्वेवरील अवलंबित्व कमी करून वेनेझुएलाच्या तेल संपत्तीवर नियंत्रण मिळवायचे आहे. रशिया आणि चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे अमेरिकेने दक्षिण अमेरिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ही लष्करी पावले उचलली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर या कारवाईवर टीका होतेय. 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? ‘त्या’ व्हायरल दाव्याचे सत्य आले समोर मार्च २०२६ पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असून एटीएममधूनही या नोटा मिळणार नाहीत, असा दावा सोशल मीडियावरून केला जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या ‘पीआयबी’ फैक्ट चेक टीमने हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केलेय. सरकारने स्पष्ट केले की, ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा योजना सध्या विचाराधीन नाही. ५०० रुपयांची नोट पूर्णपणे वैध असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आलेय. यापूर्वीही अनेकदा अशा वावड्या उठल्या होत्या, ज्यांचे अर्थ मंत्रालयाने खंडन केले. त्यामुळे ५०० रुपयांच्या नोटांचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहतील. BSE सेंसेक्स्या प्रवासाची 40 वर्षे पूर्ण; 10 हजारांचे झाले 15.7 लाख रुपये आशियातील सर्वात जुना शेअर बाजार असलेल्या ‘बीएसई’च्या सेंसेक्सने १ जानेवारी २०२६ रोजी आपल्या प्रवासाची ४० वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. १९८६ मध्ये अवघ्या ५५० अंकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ८६,००० अंकांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचलाय. या चार दशकांत सेंसेक्सने गुंतवणूकदारांना १५,५९४% इतका प्रचंड परतावा दिला. जर एखाद्या व्यक्तीने ४० वर्षांपूर्वी सेंसेक्समध्ये १० हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य १५.७ लाख रुपये झाले असते. वार्षिक १५% CAGR दराने परतावा देत सेंसेक्सने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बँक एफडीलाही मागे टाकलेय. सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी या यशाचे कौतुक करताना म्हटले की, “सेंसेक्स हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा ‘हार्टबीट इंडेक्स’ असून तो जागतिक स्तरावर एक मजबूत इंडिकेटर म्हणून ओळखला जातो.” सध्या ३० मोठ्या कंपन्यांचा समावेश असलेला हा निर्देशांक अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. टाटा पंचचे नवीन मॉडेल 13 जानेवारीला होणार लाँच; मिळणार भरपूर प्रीमियम फीचर्स टाटा मोटर्स आपली सर्वाधिक विक्री होणारी मायक्रो एसयूव्ही ‘टाटा पंच’चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल १३ जानेवारी रोजी बाजारात उतरवणार आहे. २०२१ मध्ये लाँच झाल्यानंतर या गाडीला मिळणारे हे पहिला मोठे अपडेट असून, याचे डिझाइन प्रामुख्याने ‘पंच ईव्ही’वरून प्रेरित असेल. यामध्ये नवीन फ्रंट ग्रिल, सुधारित हेडलॅम्प्स आणि आकर्षक अलॉय व्हील्स पाहायला मिळतील. गाडीच्या अंतर्गत भागात १०.२५ इंचाची मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम, टू-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश असेल. इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, यात सध्याचे १.२ लीटर पेट्रोल इंजिन ८८ hp कायम ठेवले जाईल. मॅन्युअल आणि एएमटीसह ही गाडी सीएनजी पर्यायातही उपलब्ध असेल. या नवीन मॉडेलची किंमत साधारण ६ लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता असून, बाजारात तिची ह्युंदाई एक्सटरशी मोठी स्पर्धा असेल. मराठी चित्रपटाची ऐतिहासिक भरारी; ‘दशावतार’ची ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत निवड कोकणच्या समृद्ध लोककलेचा वारसा सांगणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारांच्या ‘मेन ओपन फिल्म कॅटेगरी’मध्ये स्थान मिळवून इतिहास रचलाय. या श्रेणीत निवड होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला असून, जगभरातील १५० हून अधिक चित्रपटांच्या स्पर्धेत तो आपले नशीब आजमावणार आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी ही आनंदाची बातमी देताना, “मराठी चित्रपट जागतिक स्तरावर तोडीस तोड उभा राहू शकतो, हे सिद्ध झाले,” अशी भावूक पोस्ट शेअर केली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २८ कोटींची कमाई केलीय. या यशाने मराठी चित्रपटसृष्टीची मान जागतिक स्तरावर उंचावली असून सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होतोय. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ जाहीर; वनडे मालिकेसाठी शुबमन गिलकडे नेतृत्व न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झालीय. दुखापतीतून सावरलेला शुबमन गिल संघात परतला असून तोच या मालिकेचे नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार कामगिरी करणारे रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेतही आकर्षणाचे केंद्र असतील. दुसरीकडे, श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद दिले असले तरी, त्याचे खेळणे फिटनेस सर्टिफिकेटवर अवलंबून आहे. संघात के.एल. राहुल, ऋषभ पंत आणि युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांचाही समावेश आहे. या मालिकेचा पहिला सामना ११ जानेवारीला वडोदरा येथे, दुसरा १४ जानेवारीला राजकोट आणि तिसरा १८ जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.