Todays TOP 10 News: डाॅ. बाबासाहेबांचे नाव टाळण्यावर मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण ते 350 प्रवाशांसह जहाज बुडाले.. वाचा आजच्या टाॅप बातम्या
Todays TOP 10 News: राज्यासह देश विदेशातील महत्वाच्या बातच्या वाचा

Todays TOP 10 News: बाबासाहेबांचे नाव घेणे का टाळले? मंत्री गिरीश महाजनांनी दिले स्पष्टीकरण
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळल्याने वन विभागात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी माधवी जाधव यांनी त्यांना भर कार्यक्रमात जाब विचारला.
संविधानामुळेच आपण सर्व पदांवर आहोत, मग मुख्य मानकरी असलेल्या बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही, असा सवाल करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता.
मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. माझा त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळेस असे काही होत नाही. मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राजधानीत ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर; कर्तव्य पथावर अवतरला गणेशोत्सव
भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आज राजधानीतील कर्तव्य पथावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण केल्यानंतर झालेल्या दिमाखदार संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘गणेशोत्सव’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या चित्ररथात राज्यातील सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवण्यात आले.
चित्ररथावर अष्टविनायक प्रतिकृती, मूर्ती साकारणारा कलाकार आणि ढोल पथकातील महिला वादकांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. एकूण ३० चित्ररथांच्या सहभागात महाराष्ट्राच्या कलाकारांनी सादर केलेला नृत्याविष्कार प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला.
भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया; पद्मभूषण RSS, संघ कार्यकर्त्यांना समर्पित
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटलेय. या पुरस्कारावरून महाविकास आघाडीने तीव्र आक्षेप घेत ‘संविधानाची हत्या’ करणाऱ्याचा हा गौरव असल्याची टीका केली.
यावर प्रत्युत्तर देताना कोश्यारी यांनी आपण संघाचे स्वयंसेवक असून केवळ भारतमातेच्या सेवेसाठी काम करत असल्याचे म्हटले. आपल्या कामामुळे कोणाला वाईट वाटत असेल, तर आपण त्याला काहीही करू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा सन्मान आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित करत असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींचे आभार मानले.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी या पुरस्कारावरून भाजपावर महाराष्ट्राचा अपमान केल्याचा घणाघाती आरोप केलाय. या महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते. असे राऊत यांनी म्हंटले. भगतसिंह कोश्यारी हे 2019 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
मराठमोळा रील स्टार प्रथमेश कदमचे निधन; आईसोबत बनवायचा मजेशीर व्हिडिओ
मराठमोळा रील स्टार आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचे अल्पशा आजाराने निधन झाले असून, त्याच्या जाण्याने चाहत्यांवर शोककळा पसरलीय. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता.
त्याचा मित्र तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिलाय. प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांच्या जोडीचे रिल्स सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलत त्याने आईलाही खंबीर साथ दिली होती.
अगदी रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्याने चाहत्यांचे मनोरंजन करणे सोडले नव्हते. त्याच्या निधनामुळे मराठी कलाविश्वातून आणि नेटकऱ्यांकडून मोठी हळहळ व्यक्त केली जातेय.
भारतीय लष्कराची ‘स्मार्ट’ ताकद; परेडमध्ये आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर भारतीय लष्कराने आपल्या आधुनिक युद्धक्षमतेचे चित्तवेधक प्रदर्शन केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील यशानंतर प्रथमच लष्कराने स्वदेशी ड्रोन, रोबोटिक सिस्टीम आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या जोरावर आपली वाढलेली ताकद जगाला दाखवून दिली.
युक्रेन युद्धातील अनुभवातून शिकत लष्कराने रणगाड्यांवर अँटी-ड्रोन सुरक्षा कवच तैनात केले असून, ड्रोनच्या वापरामुळे शत्रूवर हल्ला करण्याचा वेळ ३० मिनिटांवरून केवळ ३ मिनिटांवर आलाय.
यावेळी १५०० किमी पल्ला गाठणारे हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि सूर्यास्त्र रॉकेट लॉन्चर ही परेडची प्रमुख आकर्षणे ठरली. आता आपले सैन्य केवळ पारंपरिक पद्धतीने नाही, तर हायटेक तंत्रज्ञानाने युद्ध लढण्यासाठी सज्ज झालेय.
350 प्रवाशांसह जहाज बुडाले; 15 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
फिलीपिन्सच्या समुद्रात ‘एम/वी ट्रिशा कर्स्टन ३’ या प्रवासी जहाजाचा भीषण अपघात झाल्याने मोठी दुर्घटना घडलीय. ३५० पेक्षा अधिक प्रवासी असलेल्या या जहाजाचा तोल बिघडल्याने ते एका बाजूला झुकले आणि पाहता पाहता समुद्रात बुडाले.
या हृदयद्रावक घटनेत आतापर्यंत १५ मृतदेह हाती लागले असून शेकडो प्रवाशांना वाचवण्यात यश आलेय. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.
स्थानिक कोस्ट गार्ड आणि बचाव पथकांकडून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जातेय. सरकारने या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीएनजी कार विक्रीत मारुति अर्टिगाचा बोलबाला; टाटा आणि ह्युंदाईलाही ग्राहकांची पसंती
डिझेल इंजिनच्या वाढत्या किमती आणि इंधनाचे दर गगनाला भिडल्याने भारतीय ग्राहकांचा ओढा आता सीएनजी कारकडे वाढलाय. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये देशात सीएनजी गाड्यांच्या विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला असून, मारुति सुझुकी अर्टिगा १,२९,९२० युनिट्ससह अव्वल स्थानी राहिलीय.
कमी खर्च आणि उत्तम मायलेजमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सीएनजी आता पहिला पर्याय ठरतेय. मारुतीच्या वॅगनआर आणि डिझायरने अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावत आपला दबदबा कायम राखलाय.
दुसरीकडे टाटा पंच आणि मारुति ब्रेझानेही विक्रीत मोठी मजल मारली असून टाटा नेक्सॉन व ह्युंदाई ऑरा सारख्या मॉडल्सनी ग्राहकांना आकर्षित केलेय. विशेष म्हणजे, आता केवळ छोट्या कारपुरते मर्यादित न राहता अर्टिगा, ग्रँड विटारा आणि एक्सएल ६ सारख्या प्रीमियम गाड्यांमध्येही सीएनजीचा पर्याय लोकप्रिय होत असल्याचे दिसून येतेय.
बजेटमध्ये टॅक्स, कस्टम ड्युटीत बदलांची शक्यता; सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे
येत्या १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नववे बजेट सादर करणार असून, या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांसह उद्योजकांना मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळच्या बजेटमध्ये सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्युटीच्या संरचनेत जीएसटीच्या धर्तीवर मोठे बदल होण्याची शक्यता असून, यामुळे आयात-निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते.
वैयक्तिक करदात्यांसाठी ‘स्टँडर्ड डिडक्शन’मध्ये वाढ करून सरकार मोठा दिलासा देण्याची चिन्हे आहेत. तसेच १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन प्राप्तिकर कायदा २०२५ बाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होऊ शकतात.
टीडीएसचे नियम सोपे करण्यासोबतच जुन्या कर प्रणालीऐवजी नवीन कर प्रणालीकडे नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या जाऊ शकतात. संरक्षण क्षेत्रातील वाढता तणाव पाहता या क्षेत्रासाठी भरीव तरतूद अपेक्षित आहे. याशिवाय, ८ व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष या बजेटकडे लागलेय. ग्रामीण विकास आणि रोजगारासाठी नवीन योजनांची घोषणाही होऊ शकते.
‘बॉर्डर 2’च्या वादळातही ‘धुरंधर’चा ऐतिहासिक विक्रम; IMDb च्या टॉप 250 चित्रपटांत मिळाले स्थान
सध्या बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर २’ ने शंभर कोटींचा टप्पा पार करत धुमाकूळ घातला असला, तरी रणवीर सिंह स्टारर ‘धुरंधर’ चित्रपटाने आपला वेगळाच दबदबा निर्माण केलाय. जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाने आता प्रतिष्ठित IMDb च्या ‘ऑल-टाइम टॉप २५०’ चित्रपटांच्या जागतिक यादीत २५० वे स्थान पटकावलेय.
८.५ रेटिंग मिळवणारा हा चित्रपट रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील सर्वाधिक रेटिंग असलेला चित्रपट ठरलाय. केवळ कौतुकाची थापच नव्हे, तर कमाईच्या बाबतीतही आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-थ्रिलरने १३०० कोटींचा टप्पा ओलांडून ‘बाहुबली’ आणि ‘दंगल’ सारख्या मोठ्या चित्रपटांना आव्हान दिलेय.
अक्षय खन्ना, संजय दत्त आणि आर. माधवन अशा दिग्गज कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाने सिद्ध केले की, तगडी पटकथा आणि दमदार दिग्दर्शन असेल तर कोणत्याही मोठ्या स्पर्धेसमोर चित्रपट आपला ठसा उमटवू शकतो.
तिलक वर्मा मालिकेबाहेर; श्रेयस अय्यरचा मुक्काम वाढला –
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघात कायम राहणार आहे. युवा फलंदाज तिलक वर्मा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने निवड समितीने हा निर्णय घेतलाय.
तिलकवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून, तो थेट टी-२० वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरसाठी ही मोठी संधी मानली जातेय. जर तो उर्वरित सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर वर्ल्ड कप संघात त्याचा दावा अधिक भक्कम होईल. शेवटचे दोन सामने विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरम येथे होणार आहेत.











