१३,५०० ईव्हीएमची गरज! महापालिकेची निवडणूक आयोगाकडे धाव; उमेदवारांच्या गर्दीचा फटका

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. मागील निवडणुकीची स्थिती लक्षात घेता महापालिकेस ९ हजार ईव्हीएम मशिन दिले होते. मात्र, आता काही प्रभागात चारपेक्षा अधिक मशिनची आवश्यकता असल्याने महापालिकेस आणखी सुमारे साडेचार हजार मशिनची आवश्यकता आहे. त्यामुळे, महापालिकेची मशिनसाठी धावाधाव सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सुमारे १३ हजार अर्जांची विक्री झाली होती. उमेदवारांनी तीन हजार अर्ज दाखल केले होते. त्यानंतर उमेदवारांनी माघार घेतल्यानंतरही मैदानात हजारांहून अधिक उमेदवार मैदानात आहेत. काही प्रभागात उमेदवारांची संख्या ४० पेक्षा अधिक असल्याने त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर चार मशिनची आवश्यकता आहे.
त्यानुसार, महापालिकेने प्रभागनिहाय प्रत्येक मतदानकेंद्रासाठी किती मशिन लागतील याची माहिती संकलित करण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेस तब्बल १३५०० ईव्हीएम मशिनची आवश्यकता आहे. त्यामुळे, महापालिकेने निवडणूक आयोगाकडे या वाढीव मशिनची तातडीनं मागणी केल्याचे पालिकेतून सांगण्यात आले.





