US attacks Venezuela : जागतिक राजकारणाला हादरावणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने वेनेझुएलावर मोठी लष्करी कारवाई केली असून, वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकन सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईची पुष्टी केली असून, मादुरो यांना अटक करून देशाबाहेर नेण्यात आल्याचा दावा केला आहे. शनिवारी पहाटे (स्थानिक वेळेनुसार रात्री २ च्या सुमारास) वेनेझुएलाची राजधानी काराकास भीषण स्फोटांनी हादरली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, किमान सात मोठे धमाके ऐकू आले आणि आकाशात अत्यंत कमी उंचीवरून जाणारी लढाऊ विमाने दिसली. या हल्ल्यांनंतर काराकासमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिक घाबरून घराबाहेर पडले आहेत. राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी तातडीने देशात आणीबाणी घोषित केली होती, मात्र त्यांनतर काही वेळातच त्यांना ताब्यात घेण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या माध्यमावर या मोहिमेची माहिती दिली. ते म्हणाले, “अमेरिकन लष्करी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांनी संयुक्तपणे वेनेझुएलामध्ये यशस्वी मोहीम फत्ते केली आहे. निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडून देशाबाहेर नेण्यात आले आहे.” मादुरो बेपत्ता; जिवंत असल्याचा पुरावा द्या – वेनेझुएला दुसरीकडे, वेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारी टीव्हीवर सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नीचा ठावठिकाणा सध्या आम्हाला माहित नाही. अमेरिका दावा करत असेल तर त्यांनी मादुरो जिवंत असल्याचा पुरावा द्यावा.” अमेरिकेने अनेक राज्यांमधील लष्करी तळांवर आणि सरकारी प्रतिष्ठानांवर हवाई हल्ले केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अमेरिका आणि वेनेझुएला यांच्यातील तणाव गेल्या काही महिन्यांपासून शिगेला पोहोचला होता. समुद्रबंदी आणि जहाजांवर हल्ले झाले आहेत. सप्टेंबर २०२५ पासून अमेरिकेने मादक पदार्थांच्या तस्करीचा आरोप करत वेनेझुएलाच्या २५ हून अधिक बोटींवर हल्ले केले होते. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने आपली सर्वात आधुनिक युद्धनौका ‘यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड’ कॅरिबियन समुद्रात तैनात केली होती. अमेरिकेने वेनेझुएलाच्या तेलावर निर्बंध लादले असून त्यांची तेलवाहू जहाजे सातत्याने जप्त केली जात होती. या लष्करी कारवाईमुळे संपूर्ण दक्षिण अमेरिकेत खळबळ उडाली असून, या घटनेचे जागतिक स्तरावर मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.