नवी मुंबई : राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत भाजपने मतदानापूर्वीच विजयाचा खाते उघडले आहे. यामध्ये कल्याण डोंबिवली, ठाणे, भिवंडी, अहिल्यानगर आणि आता पनवेल महापालिकेतही मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध केले आहेत. पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पनवेल महापालिका निवडणुकासाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे, भाजपचे जवळपास 8 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. येथून भाजपचे नितीन पाटील सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाले आहेत. नितीन पाटील यांची प्रभाग 18 (ब) मधून निवड झाली आहे. येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा छाननी प्रक्रियेत अर्ज बाद झाल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. परिणामी पनवेल महापालिकेसाठी मतदानापूर्वीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. त्यानंतर, आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांचे अर्ज माघारी घेतल्याने एकूण 8 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे, पनवेल महापालिकेत महायुतीचे 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. येथील शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने भाजपचा विजयी मार्ग सुकर झाल्याचे बोललेले जात आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे – १) नितीन पाटील २) रुचिता लोंढे ३) अजय बहिरा ४) दर्शना भोईर ५) प्रियंका कांडपिळे ६) ममता प्रितम म्हात्रे ७) स्नेहल ढमाले दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत भाजपने पनवेल महापालिकेत 78 पैकी 51 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. यंदा महायुती अंतर्गत जागावाटप झाले असून, भाजपला 71 जागा, शिवसेना शिंदे गटाला 4, राष्ट्रवादी अजित गटाला 2 आणि आरपीआय आठवले गटाला 1 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडी कमकुवत दिसत आहे. पनवेल महापालिकेत भाजपची मजबूत सुरुवात झाली असून, उर्वरित जागांसाठी लढत कडवी होण्याची शक्यता आहे.