‘मला हलक्यात घेऊ नका’, शिंदेंचे हे वक्तव्य नक्की कोणासाठी होते? अजित पवारांच्या प्रश्नावर स्वतःच केला खुलासा

Eknath Shinde-Ajit Pawar | दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम पार पाडला. साहित्य संमेलनात राजकीय नेते देखील व्यासपीठावर पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आल्यानंतरही जोरदार चर्चा रंगली. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शाब्दिक फटकेबाजीची देखील विशेष चर्चा रंगली.
संमेलनाच्या समारोप कार्यक्रमावेळी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी भाषण करताना जोरदार फटकेबाजी केली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शिंदेंच्या ‘मला हलक्यात घेऊ नका’ या वक्तव्याचा देखील उल्लेख केला.
संमेलनाच्या समारोप भाषणावेळी अजित पवार म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आले. आपल्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि मी एकाच व्यासपीठवर अनेक वेळा असतो. अशा वेळी आमच्या देहबोलीचा अभ्यास सुरू असतो. त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहीजे. उगाच कोणती बातमी नको. नाही तर नाराज असल्याच्या बातम्या उगाचच केल्या जाता. पण आमच्यात कोणतीही नाराजी नाही.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शब्द वापरला की मला हलक्यात घेऊ नका. आता ते नेमकं कोणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही. मग मशालीने (ठाकरे गट) हलक्यात घ्यायचे नाही की अजून कोणाला घ्यायचे नाही?, असा सवाल त्यांनी विचारला.
त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. ‘मला हलक्यात घेऊ नका हे अडीच वर्षांपूर्वीचं होतं’, असं म्हणत त्यांनी हे वक्तव्य अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंसाठी होते हे स्पष्ट तर केलेच. सोबतच, अजित पवारांच्या प्रश्नाचे उत्तरही दिले.





