Todays Top 10 News: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांची एन्ट्री, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ आणि विजय-रश्मिकाचे लग्न; वाचा आजच्या टाॅप बातम्या
Todays Top 10 News: पवार कुटुंबात नवे फेरबदल, सरकारी पगारवाढ, मुंबईचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प आणि विजय-रश्मिकाचे लग्न; वाचा आजच्या १० महत्त्वाच्या बातम्या.

Todays Top 10 News: अजित पवारांच्या नावाने पुरस्काराची योजना सुरू करावी; अमोल मिटकरींची विधानपरिषदेत मागणी
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झालीय. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज विधानपरिषदेत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राज्याच्यावतीने कृषी, साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना अजित पवारांच्या नावाने एक राज्यस्तरीय पुरस्काराची योजना जाहीर करणे ही खरी आदरांजली ठरेल.
हा सन्मान कोण्या व्यक्तिपूरता नाही तर तो कार्यपद्धतीचा सन्मान आहे, तो निर्णयक्षमतेचा, सातत्याचा आणि परिणामकारक अंमलबजावणीचा सन्मान आहे.
राज्यसभा निवडणूकीसाठी महायुतीत हालचालींना वेग; रामदास आठवलेंची उमेदवारी निश्चित?
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी राजकीय संघर्ष तीव्र झाला असून भाजपच्या गोटात उमेदवारांच्या निवडीसाठी खलबते सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत रामदास आठवले यांचे नाव निश्चित मानले जात असले, तरी उर्वरित जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर, रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यात मोठी स्पर्धा आहे.
अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण लवकरच दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांच्या नावावर चर्चा सुरू असून, ठाकरे गटानेही एका जागेसाठी आग्रह धरलाय. संख्याबळानुसार सातपैकी सहा जागांवर महायुतीचे वर्चस्व राहण्याची शक्यता असून, लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. ५ मार्च पर्यंत अर्ज सादर करायचे असून १६ मार्चला मतदान होईल. निकालही त्याच दिवशी जाहीर होतील.
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार रिंगणात; पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित केलीय. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, सहा महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. याच बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आलेय. दरम्यान, आगामी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता असल्याने राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळत आहेत.
सविस्तर वृत्त – बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार रिंगणात
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ जाहीर
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झालीय. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
जुलै २०२५ पासून हा भत्ता सध्याच्या ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वाढीव भत्त्याचा लाभ जुलै २०२५ पासून लागू होणार असून त्यानुसार थकबाकीही देण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त – राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ जाहीर
2019 नंतरच्या शेतकऱ्यांनाही मिळणार ‘सन्मान निधी’; कृषीमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन
1 फेब्रुवारी 2019 च्या जाचक निकषामुळे नवीन जमीन खरेदीदार शेतकरी ‘पीएम किसान’ व ‘नमो शेतकरी’ योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. हा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक आश्वासन दिलेय.
मंत्री भरणे म्हणाले की, सध्याच्या निकषांनुसार नवीन खरेदीदार अपात्र ठरत असले, तरी हा निकष बदलण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केलाय. पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निकषांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत केंद्राशी चर्चा करून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन भरणे यांनी दिले. यामुळे नवीन शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात.
मुंबई महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प; विकासासाठी मोडणार 36 हजार कोटींच्या ठेवी
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आज सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 80952.56 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला. ज्यात 89.84 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम दाखवण्यात आलीय.
गेल्या वर्षीच्या 74427.41 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 8.77 टक्क्यांची भरीव वाढ झाली असून, यामध्ये विकासकामांवर विशेष लक्ष केंद्रित करतानाच प्रशासकीय खर्चात कपात करण्याचे धोरण अवलंबण्यात आलेय. दरम्यान, विकासकामांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महापालिका आपल्या काही मुदत ठेवी मोडण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहितीही या अर्थसंकल्पातून समोर आलीय.
सविस्तर वृत्त – मुंबई महापालिका 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार, काय आहे कारण?
प्रियकराला सोडून आईकडे जाण्याचा निर्णय; भिगवण प्रकरणातील तरुणीचा कोर्टात ‘यू-टर्न’
भिगवण येथील बहुचर्चित कथित अपहरण प्रकरणाला पाच दिवसांतच अनपेक्षित वळण मिळालेय. बारामती न्यायालयात प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट धरणारी तरुणी आता आई आणि मामाकडे जाण्यास तयार झालीय. १७ फेब्रुवारी रोजी जहीर शेख या तरुणासोबत गेलेल्या या तरुणीने सुरुवातीला आईकडे जाण्यास नकार दिला होता, ज्यामुळे तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती.
मात्र, इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिने आपला जबाब बदलला. न्यायालयाने तरुणीची इच्छा मान्य करत तिचा ताबा कुटुंबीयांकडे देण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणावरून जिल्ह्यात मोठा तणाव निर्माण झाला होता, मात्र मुलीच्या या भूमिकेमुळे प्रकरणावर तूर्तास पडदा पडलाय.
सविस्तर वृत्त – भिगवण प्रकरणातील तरुणीने कोर्टात बदलला जबाब; आईकडे जाण्याची इच्छा केली व्यक्त
खाण विभागाच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; ट्रॉली बॅगेत आढळली 4 कोटींची रोकड
ओडिशातील खाण विभागाचे उपसंचालक देबब्रता मोहंती यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांच्या भुवनेश्वर येथील फ्लॅटमधून तब्बल ४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय. एका परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना दक्षता पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले होते.
या अटकेनंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता, एका ट्रॉली बॅगेत नोटांचे बंडल कोंबून ठेवल्याचे समोर आले. राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोकड जप्ती मानली जातेय. रोख रकमेसह मोहंती यांच्याकडे भुवनेश्वरमध्ये आलिशान दुमजली घर आणि १३० ग्रॅम सोने असल्याचेही तपासात निष्पन्न झालेय.
सविस्तर वृत्त – बड्या अधिकाऱ्याच्या घरी सापडले 4 कोटींचे घबाड; राज्यात खळबळ
विजय-रश्मिकाने लग्नापूर्वी खेळला क्रिकेट सामना; वधू-वरांचा संघ आमनेसामने
दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील अभिनेते विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाचे विधी मंगळवारपासून सुरू झाले. दोन दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारीला लग्न होणार आहे. उदयपूरमधील ‘मोमेंटोस एकाया’ हॉटेलमध्ये वधू-वरांच्या कुटुंबाव्यतिरिक्त पाहुणे पोहोचलेत.
वधू-वरांनी मंगळवारी हॉटेलमध्ये त्यांच्या मित्रांसोबत क्रिकेट सामना खेळला, ज्याला ‘VIROSH प्रीमियर लीग’ असे नाव देण्यात आले. याचे फोटोही दोघांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेत. सोशल मीडियावर चाहतेही त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. चाहत्यांनी या लग्नाला ‘वेडिंग ऑफ VIROSH’ असे नाव दिलेय. विजय-रश्मिका त्यांच्या कुटुंबासोबत २३ फेब्रुवारीच्या सकाळी हॉटेलमध्ये पोहोचले होते.
शिखर धवनच्या घटस्फोटावर न्यायालयाचा मोठा निर्णय; 5.7 कोटी रुपये परत करण्याचे आयशा मुखर्जीला आदेश
माजी क्रिकेटपटू शिखर धवन यांची माजी पत्नी आयशा मुखर्जी यांना ५.७ कोटी रुपये परत करावे लागतील. धवन यांनी हे पैसे आयशा यांना घटस्फोटानंतरच्या सेटलमेंट म्हणून दिले होते, परंतु दिल्ली उच्च न्यायालयाचे मत आहे की धवन यांच्याकडून मालमत्ता सेटलमेंट म्हणून दिलेली ही रक्कम भारतीय कायद्यानुसार योग्य नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय भारतावर लागू होणार नाही.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, भारतीय कौटुंबिक कायदा अधिनियम १९७५ अंतर्गत मालमत्ता सेटलमेंटचा नियम भारतीय वैवाहिक कायदा आणि हिंदू विवाह अधिनियम १९५५ शी सुसंगत आहे. त्यामुळे आयशा यांनी मालमत्ता सेटलमेंट नियमानुसार जी ५.७ कोटी रुपयांची रक्कम घेतली आहे, ती शिखर धवन यांना परत करावी लागेल.
सविस्तर वृत्त – शिखर धवनच्या घटस्फोट प्रकरणात दिल्ली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय दिले ‘हे’ आदेश









