सांगली -मुंबईहून कडेगाव तालुक्यातील सोहोली येथे आलेले दोन व्यक्ती आणि शिराळा तालुक्यातील रेड येथे आलेल्या एका पुरुषाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी रेडमधील बाधित पुरुषाची पत्नी आणि शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द आणि खानापूर तालुक्यातील बलवडे येथील तीन व्यक्तीकरोना पॉझिटिव्ह आले.
तर मिरज, सांगली आणि तासगाव तालुक्यातील तिघांनी करोनावर मात केली आहे. सध्या 23 व्यक्तींवर आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत. दिल्लीहून बलवडी (खा.) (ता. खानापूर) येथे 55 वर्षीय व्यक्ती दि. 15 मे रोजी आली आहे. चेकपोस्टवर तपासणी केली असता लक्षणे आढळली नव्हती. त्यांना होम क्वारंटाइन केले होते. सर्वेक्षणावेळी या व्यक्तीत लक्षणे आढळली.
त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईहून रेड येथे 42 वर्षीय महिला दि. 17 रोजी आली आहे. सर्वेक्षणावेळी या महिलेमध्ये लक्षणे आढळली. त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. बुधवारी त्यांच्या पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला. मुंबईतून अंत्री खुर्द येथे आलेल्या 43 वर्षीय व्यक्तीचा चाचणी अहवाल मंगळवारी करोना पॉझिटिव्ह आला. कोपरखैरणे येथून ही व्यक्ती दि. 16 मे रोजी अंत्री खुर्द या गावी येण्यासाठी निघाली होती. तत्पूर्वी ही व्यक्ती ताप आल्याने दि.
12 मे रोजी वाशी महापालिकेच्या रुग्णालयात गेली होती. या व्यक्तीचा स्त्राव दि. 16 रोजी तपासणीसाठी मुंबईतील रुग्णालयातून तपासणीसाठी पाठविण्यात आल. या व्यक्तीला मुंबईतून होम क्वारंटाइनचा शिक्का मारुन शिराळा तालुक्यात अंत्री खर्दु येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. सोहोली येथील मुंबईस्थित करोनाबाधित महिलेचे नातेवाईक सोहोली येथे आले होते. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. या नातेवाईकांचे स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. बुधवारी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मिरज, सांगली आणि तासगाव तालुक्यांतील गव्हाण येथील तिघांच्या स्त्रावाचे नमुने बुधवारी निगेटिव्ह आले. या तिघांनी करोनावर मात केली. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 59 वर पोहेचली आहे.