बेंगळूरुतील स्फोटात तिघेजण ठार

बेंगळूरु  – बेंगळूरुतील एका वाहतूक कंपनीच्या गोदामामध्ये आज झालेल्या स्फोटात किमान तिघेजण ठार झाले आणि अन्य चौघेजण जखमी झाले. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. थारागुपेट भागातल्या एका पंक्‍चर काढण्याच्या एका दुकानाशेजारील या गोदामात हा स्फोट झाला. या स्फोटात या पंक्‍चरच्या दुकानातील दोघांसह तिघेजण ठार झाले. तर चौघेजण जखमी झाले, असे दक्षिण बेंगळूरूचे सहायक पोलीस आयुक्‍त हरिष पांडे यांनी पत्रकारांना सांगितले. या स्फोटातील तिन्ही मृतांची ओळख पटवण्यात आली आहे, असेही पलिसांनी सांगितले.

या स्फोटाच्या नेमक्‍या कारणांचा शोध घेतला जात आहे. हा स्फोट कोणत्याही सिलेंडरमुळे, फटाक्‍यांमुळे अथवा शॉर्ट सर्किटमुळे झालेला नव्हता. घटनास्थळी कॉम्प्रसरचे तुकडेही पडलेले नव्हते. हा स्फोट काही रासायनिक द्रव्याच्या असुरक्षित साठ्यामुळे झाला. हे रसायन औद्योगिक कारणांसाठी साठवण्यात आले होते, असे स्पष्टिकरण अधिकाऱ्यांनी दिले आहे.

या स्फोटाच्या कारणांबाबत फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून अहवाल देण्यात येईल, असेही पांडे यांनी सांगितले. या गोदामामध्ये काही असुरक्षित स्फोटक पदार्थांची आणखीन 60 खोकीही ठेवलेली आहेत. याबाबत मालकाकडे अधिक चौकशी केली जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या स्फोटाचा आवाज 2 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. जवळच्या लोकांना भूकंपाचा भास झाला, असेही पोलीस म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.