पिंपरी (प्रतिनिधी): सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल संशयित करोना रुग्णांपैकी गुरुवारी (दि. 18) तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, दापोडीतील दोघे रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बाधित रुग्ण पुणे, भोर आणि औंध येथील रहिवाशी आहेत.
पुणे-महात्मा फुले पेठ येथील 75 वर्षीय वृद्धासह भोर आणि औंध येथील अनुक्रमे 32 आणि 46 वर्षीय पुरुषाचा करोनाबाधितांमध्ये समावेश आहे. करोनामुक्त झालेले दापोडीतील दोघे हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामध्ये 40 वर्षीय पुरुष आणि 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
रुग्णालयामध्ये आज 6 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या 24 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत 58 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.