हृदयातल्या शिवरायांना कृतीत उतरवणे हीच खरी शिवजयंती

डॉ. सीमा निकम : खानापूरच्या व्याख्यानात उलगडले राजांचे अज्ञात पैलू

खानापूर (सांगली)- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे द्रष्टे आणि जाणते राजे होते, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र, त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आपण त्या विचारांचे आचरण करणार नसू, तर शिवचरित्र जाणून घेणे, वाचन करणे अथवा त्याचा अभ्यास करणे व्यर्थ ठरू शकते. इंटरनेटच्या युगात सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्या आजच्या दिशाहिन युवापिढीसमोर छत्रपती शिवरायांचा मोठा आदर्श आहे, ही भाग्याची गोष्ट आहे. हृदयात जपलेल्या शिवरायांना कृतीत उतरवणे म्हणजे खरी शिवजयंती साजरी करणे होय, असे प्रतिपादन चिंचवड-पुणे येथील नामांकित व्याख्यात्या डॉ. सीमा निकम यांनी केले.

मोही, त. खानापूर, जि. सांगली येथील शिव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवजयंतीनिमित्त डॉ. निकम यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. निकम यांच्या हस्ते “कोव्हिड योद्‌ध्यांचा’ सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना निकम पुढे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमच सामाजिक आणि उदात्त दृष्टीकोन ठेवला. पर्यावरणाच्या जतनाविषयी त्या काळात शिवरायांनी जेवढी जागरुकता दाखवली, तेवढी क्वचितच कोणी दाखवली असेल. स्त्रियांच्या अब्रुचे रक्षण करत असतानाच त्यांनी मुघल आक्रमकांच्या जनानखान्याच्या प्रवृत्तीला अजिबात थारा दिला नाही. स्वत: बहुभाषिक असलेल्या शिवरायांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिलाच, शिवाय मराठीमध्येच राजव्यवहार कोश निर्माणही केला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक बाबासाहेब वाकसे यांनी केले तर मेनका खंदारे यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.