679 मूर्ती फिरत्या हौदात केल्या विसर्जित
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा केले आहे. महापालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे अनेकांनी घरीच विसर्जन केले.
एका क्षेत्रीय कार्यालयात दोन, या प्रमाणे तीस पर्यावरणपूरक विसर्जनाचे फिरते हौद उपलब्ध करून दिल्याचे महापौरांनी सांगितले. ज्यांना घरी विसर्जन करणे शक्य नाही अशा सुमारे 679 नागरिकांनी पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या फिरत्या हौदामध्ये विसर्जन केले.
2019 मध्ये एकूण 13 हजार 858 मूर्तींचे दुसऱ्या दिवशी विसर्जन आणि दान करण्यात आले होते. मात्र यंदाच्या वर्षी 679 मूर्ती या फिरत्या विसर्जन हौदात विसर्जित केल्या गेल्या आणि 610 मूर्ती दान करण्यात आल्या. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासह पर्यावरणाला हातभारही लागला.