नागपूर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस आज 22 जुलै रोजी एकाच दिवशी आहे. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी खास मानला जात आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच आता नागपूरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अजित पवार आणि देवेंद्र पडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये दोन्ही नेत्यांचे सोबत फोटो असलेले बॅनर्स झळकले आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर “ही दोस्ती तुटायची नाय” अशी मराठी गाण्याची ओळ लिहून दोघांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याशिवाय या बॅनर्सवर ‘राजकारणातील ‘दादा’ अजित दादा आणि राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस’ असे देखील लिहिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जवर एका बाजूला शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आहे.
तर दुसरीकडे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग्स लावले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेले सुचक ट्वीट देखील चर्चेत आले आहे. ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ अशा कॅप्शनसह अमोल मिटकरी यांनी एक अजित पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. “आपल्याला जी गोष्ट पटते लगेच त्यासाठी हो म्हणून टाकतो. परंतु कुणीही उठून सांगितली की माफी मागा. तर माफी मागायला मोकार नाही,” असे अजित पवार यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही माझा वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या मदतीसाठी द्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.