पुणे, { प्रभात वृत्तसेवा} – बीएस्सी नर्सिंग प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटीकरिता अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत बीएस्सी नर्सिंग प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्रथमत: सीईटीसाठी नोंदणी करून अर्ज करणे आवश्यक आहे. सीईटीसाठी अर्ज करण्यास 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत होती; परंतु काही विद्यार्थी आणि पालकांकडून मुदतवाढीबाबत सीईटी सेलला पत्र प्राप्त झाले. त्यात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नोंदणीची तारीख वाढवण्यात यावी, अशी मागणी होती.
हे लक्षात घेऊन राज्य सीईटी सेलने एमएच- नर्सिंग सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणीची तारीख ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही तिसरी आणि शेवटची मुदतवाढ असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या उमेदवारांनी प्रवेश परीक्षेसाठी अद्यापही अर्ज भरलेला नाही, त्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी प्राप्त झाली आहे. सविस्तर माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.