नवी दिल्ली – विजेच्या बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक ही राज्ये अव्वल आहेत, अशी माहिती सरकारतर्फे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत दिली.
ते म्हणाले की, आतापर्यंत देशात विजेवरील 8 लाख 70 हजार 141 वाहने रजिस्टर झाली आहेत. त्यात उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे 2 लाख 55 हजार 700 वाहनांची नोंद झाली असून दिल्लीत 1 लाख 25 हजार 347 आणि कर्नाटकात 72 हजार 544 वाहने रजिस्टर झाली आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत 52 हजार 506 वाहने रजिस्टर झाली आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा अधिकाधिक उपयोग देशात व्हावा आणि ही वाहने अधिक स्वस्तात उपलब्ध व्हावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या वाहनांवरील जीएसटी आता 12 टक्क्यांवरून 5 टक्के इतका करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.