रेवा: घरातल्या सर्वात लहान भावंडाने देशासाठी प्राण वेचले आहेत, त्यामुळे तो गेल्याचे दू:ख तर आहेच. पण आमची मान ताठ झाली आहे, अशी भावना शहीद जवान दीपक सिंगच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.
लडाखमध्ये चीनी फौजांशी झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यात मध्यप्रदेशातील रेवा येथील दीपक सिंग यांचा समावेश होता. मंगळवारी सायंकाळी दीपक गेल्याचे वृत्त लष्कराने कळवले, त्यावेळी त्याच्या कुटुंबियांवर आभाळच कोसळले. रेवा जिल्ह्यातील मंगवान तालुक्यातील फरेदा गावातील दीपक हा रहिवासी. त्याचा मृतदेह अद्याप लेहमध्ये आहे. तो गुरूवारी आणला जाणार आहे.
दीपक आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून लष्करात गेला. पण आता त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दीपक विवाहबध्द झाला होता. फेब्रुवारी माहिन्यात तो गावी आला होता. असं कोणाच्या मनातही आलं नव्हत, की पुढील वेळेस तो तिरंग्यात गुंडाळुन होईल.
या बातमीने आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पण तरीही माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, अशी भावना गदगदलेल्या आवाजात त्यांचे वडील गिरीराजसिंह यांनी व्यक्त केली.
दीपक त्याच्या पत्नीला पंधरवड्यापुर्वी फोन केला होता. लवकरच रजा घेऊन घरी येणार आहे. येताना काश्मिरी शाल आणि दागिने घेऊन असे त्यांनी सांगितले होते, असे स्थानिकांनी सांगितले. ही बातमी कळल्यापासून त्याची पत्नी आणि आईची शुध्दच हरपली आहे.