जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नरच्या वैभवामध्ये असलेल्या किल्ल्यांचे एक सर्किट तथा एक क्लस्टर तयार होणे गरजेचे आहे. जुन्नर सारखी दुसरी पर्यटन भूमी नाही. नुसते हेरिटेज हेरिटेज न म्हणता त्याचे संवर्धन व जतन होणे ही महत्त्वाची बाब राहणार आहे, असे प्रतिपादन पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सभापती, शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, जुन्नर नगरपरिषद व सह्याद्री गिरिभ्रमण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर शहरातील नगरपरिषदेच्या जुन्या कॉटेज रूग्णालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये जुन्नर पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि.14) पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सभापती तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
आढळराव म्हणाले की, दोन हजार वर्षांपूर्वीचे काही अवशेष या संग्रहालयात ठेवलेले आहेत, त्याचे उत्खनन याच परिसरामध्ये झालेले आहे. जुन्नर परिसराला खूप मोठा वारसा, संस्कृती तसेच मोठा इतिहास आहे. मी जेव्हा लंडन येथे वास्तव्यास होतो तेव्हा 1947 सालाच्या आधीपासून भारतातून नेलेली पुस्तके त्याठिकाणी चाळत असताना जुन्नरचा वारसा तेथे वाचायला मिळाला.
या कार्यक्रमप्रसंगी संग्रहालयाच्या शिल्लक निधीतून येथील परिसर सुशोभिकरण व ग्रीनिंगसाठी वापरण्यात यावा अशी सूचना माजी नगरसेवक मधुकर काजळे यांनी मांडली व यावर तात्काळ सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी ही बाब मान्य करीत दुजोरा दिला.
पर्यटकांना आकर्षित करणेसाठी जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाचा डीपीआर तयार करण्यासाठी काम हाती घेतले असून यामध्ये पर्यटन स्थळे,नैसर्गिक, ऐतिहासिक आणि धार्मिक या तत्त्वावर सगळ्यांचा डेटा कलेक्शन केलेला आहे आणि त्यासाठी डीपीआर करून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, जैविकता जतन या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातोय.- अतुल बेनके, आमदार
जमिनीवर बसून निषेध
या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्यामुळे माजी नगराध्यक्ष शाम पांडे, माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, माजी नगरसेवक जमीर कागदी,समीर भगत,सुवर्णा बनकर यांनी नगरपरिषदेच्या कारभाराबाबत स्टेजवर न जाता जमिनीवर बसून निषेध व्यक्त केला.