बीड – आई-वडिलांना देवासमान मानले पाहिजे असे अनेक थोर लोक सांगतात. मात्र आईच्या मृत्यूनंतर चक्क आईचे मंदिर साकारण्याचे काम येथील सावरगावाच्या तीन भावांनी केले आहे. आईच्या निधना
नंतर तिच्या स्मृती कायम आपल्या सोबत राहाव्यात यासाठी सावरगाव गावच्या खाडे वस्तीवरील तीन भावंडांनी चक्क आपल्या आईचे भव्य असे मंदिर उभे केले आहे. तसेच याच मंदिरात आईची मूर्ती बसवण्यासाठी भव्य अशा कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. राजेंद्र खाडे, विष्णू खाडे आणि छगन खाडे असे या तिन्ही भावांची नावे आहेत.
सावरगाव येथील राधाबाई खाडे आपल्या तीन मुलांना मोठ्या मेहनतीतून लहानाच मोठे केले. जेमतेम शिक्षण शिकवले. मात्र, वर्षभरापूर्वी राधाबाई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या अचानकपणे जाण्याने तिन्ही भावांवर दुःखाचे डोंगर कोसळले. आईच्या निधनानंतर तिच्या स्मृती कायम आपल्या सोबत राहाव्यात यासाठी या तिन्ही भावांनी तिचा मंदिर बनविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी घराच्या अंगणात हे मंदिर उभारले.
या मंदीरासाठी पुण्याच्या मूर्तीकाराकडून आईची सुंदर अशी मूर्ती तयार करून घेतली आणि तब्बल दहा लाख रुपये खर्च करून या मंदिराची उभारणी खाडे भावंडांनी केली आहे. तसे सावरगाव घाट हे गाव राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी आहे. या गावात अनेक देवदेवतांची मंदिर आहेत. मात्र खाडे कुटुंबीयांनी आपली आईच आपल्यासाठी सर्वस्व मानून मृत्यूनंतरही तिचा विसर पडू नये म्हणून हे एका वर्षातच मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता. विशेष म्हणजे त्यांनी हा पण पूर्ण करून दाखविला आहे.
दोन दिवसांमध्ये मूर्ती बसविणार
गेल्यावर्षी 18 मे 2022 रोजी राधाबाई खाडे यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या मुलांनी राजेंद्र, विष्णू व छगन यांनी एक वर्षाच्या आत आपल्या आईचे मंदिर बांधण्याचा संकल्प पूर्ण करायचा असा निश्चय केला होता. त्यानुसार आता त्यांचा संकल्प पूर्ण झाला असून, येत्या दोन दिवसांमध्ये या मूर्ती मंदिरात बसवली जाणार आहे. अशा प्रकारचे आपल्या स्वतःच्या आईचे या पंचक्रोशीतील हे एकमेव भव्य मंदीर असणार आहे.