Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार आप ४ तर कॉंग्रेस ३ जागा लढणार आहे. भारतीय जनता पार्टीही दिल्ली पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज झाली असून भाजप सर्व ७ जागांवर उमेदवार देणार आहे.
या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपच्या दिग्गज नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना भाजपकडून रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
एका इंग्रजी माध्यामाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दिल्लीकरता १७ ते १८ नावांची चर्चा केली जाणार आहे. दिल्लीच्या प्रदेश शाखेशी चर्चा केल्यानंतर ही नावे तयार करण्यात आली आहेत.
या आठवड्यात भाजपची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत बांसुरी स्वराज, अनिल शर्मा, सतिश उपाध्याय यांची नावे नवी दिल्लीच्या जागेसाठी चर्चेत आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली नॉर्थ इस्टच्या जागेसाठी भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी यांचे नाव फायनल झाले आहे. तिवारींसोबत आमदार अजय महावर यांच्याही नावाची चर्चा आहे.