श्रीगोंदा, {समीरण बा. नागवडे} – मोठ्या रस्त्यांलगत थांबलेल्या मालवाहतूक वाहनांमधून रात्रीच्या वेळी डीझेल चोरी करण्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. मशिनच्या सहाय्याने काही मिनिटांत हजारो रुपयांचे डिझेल काढता येत असल्याने ही वाहने ‘सॉफ्ट टार्गेट’ बनली आहेत.
तालुक्यातून जाणाऱ्या नगर-दौंड महामार्ग, नगर-सोलापूर महामार्गसह अन्य प्रमुख रस्त्यांवर मालवाहतूक करणारी वाहने रात्रीची हॉटेल अथवा इंधन पंपांवर मुक्कामी थांबतात. या वाहनांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने या वाहनांच्या इंधन टाक्या मोठ्या असतात.
काही वाहनांची क्षमता ५०० लिटरपर्यंत असते. शिवाय, या वाहनांच्या टाक्या बहुतांश वेळा ‘फुल’ असतात. हीच वाहने चोरट्यांनी ‘सॉफ्ट टार्गेट’ बनवली आहेत. त्यातच वाहनांचे चालक व ‘क्लिनर’ गाढ झोपेत असतात. हॉटेल व इंधनपंपांना अनेक ठिकाणी पहारेकरी नसल्याने तीही बाब चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहेत.
चारचाकीतून येणारी ही टोळी मशिनच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये शेकडो लिटर डिझेलची चोरी करते. एक-एका वाहनांतून तीस-तीस हजार रुपयांपर्यंत किंमतीचे डिझेल चोरी होते. शिवाय, या वाहनांना पुढचा प्रवास करायचा असल्याने ते पोलिसांत तक्रार देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मात्र, त्यांना अवघ्या काही मिनिटांमध्ये हजारो रुपयांचा झटका बसत आहे.
नुकतीच नगर-दौंड रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डिझेल चोरी करणारी टोळी एका चारचाकीसह कैद झाली आहे. मात्र, तिला नंबरप्लेट नसल्याने पुढील तपासाला गती मिळत नाही. या गंभीर प्रकारामध्ये काही ठिकाणी हॉटेल अथवा पंपांवरील कर्मचारी सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, वाहनचालकांनी अशा घटना घडल्यास पोलिसांत तक्रार देणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात सोप्या मार्गाने चोरी करण्याचे हे प्रयोग अधिक वाढण्याची शक्यता आहे.
स्वस्तात डिझेलचा ‘ड्रॉप’
डिझेल चोरीचे प्रकार गेल्या काळात अधिक वाढले आहेत. तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील वांगदरी शिवारात स्वस्तात डिझेल देण्याच्या बहण्याने ‘ड्रॉप’ झाला. त्या टोळीचा डिझेल चोरट्यांशची काही संबंध आहे का हेही तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये तालुक्यातील काही बड्यांचा हात असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.