मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, आता मलिक यांनी वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरवर निशाणा साधला आहे. क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. त्यावरच आता समीर वानखेडेंनी स्पष्टीकरण दिले आहे.
नवाब मलिक यांना प्रत्युत्तर देताना वानखे़डे यांनी म्हंटले कि, क्रांतीची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावरची केस ही २००८ सालची आहे. त्यावेळी मी नोकरीतही नव्हतो. तसंच क्रांतीशी माझं लग्न २०१७ साली झालं. मग माझा या प्रकरणाशी काही संबंध कसा असेल?
याबद्दल नवाब मलिक यांनी एक नवीन ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत. ट्वीटमध्ये मलिक म्हणतात, “समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे”. या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचं सांगितलं आहे.