नगर – शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव जिल्हा परिषद गटाच्या ढोरजळगाव येथील बालआनंद मेळाव्याच्या समारोपाच्य कार्यक्रमात शिक्षक, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी सैराट होऊन बेधुंद नाचले.याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून संबंधित सात ते आठ जणांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली.
बालमेळाव्यात हा प्रकार घडल्याने बालआनंद मेळावा नेमका कुणाच्या आनंदाला उधाण आणण्यासाठी झाला याची चर्चा होवू लागली आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणारे शिक्षक, त्यांना मार्गदर्शन करणारे केंद्रप्रमुख आणि तालुक्यातील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशा जबाबदार पदावरील व्यक्तीकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान आणि आनंद मिळावा या उदात्त हेतूने जिल्हा परिषद गटनिहाय बालआंनद मेळाव्याचे आयोजन करत असते. त्यामध्ये जिल्हा परिषद गटातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून खाद्य,कला,शैक्षणिक साहित्य दालन, भाजीबाजार लावले जातात. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धाचेही आयोजन केले जाते.
सैराटांच्या समर्थकांची प्रसारमाध्यमांवर आगपाखड सैराट होऊन बेधुंद नाचलेल्या अधिकारी व शिक्षकांचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांतून व्हायरल होत याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच या सैराटांचे समर्थक जागृक झाले. माध्यमांना केवळ शिक्षकच दिसतात का असे अकेलेचे तारे तोडून काही शिक्षक संघटनांचे तथाकथित स्वंयघोषित पुढारी मोकळे झाले.मात्र हे तकलादू समर्थन करताना त्यांना आपण नव्या पिढ्या घडविणारे जबाबदार घटक आहोत याचेही भान राहिले नाही.