मुंबई : अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) या जोडीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली होती. इतकेच काय तर त्यांनी लग्नाची तारीख देखील जाहीर केली होती. बिग बॉस मराठीच्या घरात एकत्र झळकलेली या जोडीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियावर अमृताने इन्स्टाग्रामवर लग्नापूर्वीच्या विधींचे काही फोटो शेअर केले आहेत. या कार्यक्रमात अमृता आणि प्रसाद कमालीचे सुंदर दिसत होते. अमृता-प्रसादने या ग्रहमखाच्या निमित्ताने खास फोटोशूटही केलं आहे. अमृताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तर, प्रसादने डिझायनअर कुर्ता परिधान केला आहे. अमृताने नऊवारी नेसल्यामुळे त्याला साजेसा पारंपरिक मराठमोळा लूक केला आहे. मावशीने गिफ्ट केलेली साडी यावेळी अमृताने परिधान केली आहे.
अमृता आणि प्रसाद येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, बिग बॉस मराठी 4 च्या पर्वामध्ये घरात प्रसाद आणि अमृताची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस पडली होती. बिग बॉसच्या घरा बाहेर पडल्यानंतरही त्यांनी आपले नाते चांगले ठेवले. अखेर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच अमृताने तिचे केळवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.