बेल्हे – वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत मोठी गर्दी जमवून धुमधडाक्यात लग्नसमारंभ पार पडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी वधू-वरासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांना काही अटी आणि शर्ती घालून परवानगी दिली आहे. मात्र, अटी आणि शर्तींचे पालन न करता वडगाव आनंद येथील दोन प्रतिष्ठित कुटुंबांनी नुकताच विवाह सोहळा आयोजित केला होता. हा विवाह होत असताना वर-वधू पक्षाकडील दोन्ही कुटुंबीयांकडून सरकारच्या नियम आणि अटींचे पालन केले नाही. सोहळ्यात 100 ते 150 नातेवाईक एकत्र आले होते.
अनेकांनी मास्क लावलेला नव्हता. या विवाह सोहळ्याबाबत माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी वधू-वर कुटुंबीयांवर सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस करीत आहेत.