पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरात सध्या हवामानाची “सरमिसळ’ पहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यांतच तापमान 40 अंश सेल्सीअस अंशाच्या पुढे गेल्याने उकाड्याचा चांगलाच झटका पुणेकरांना लागला आहे. शहरातील बहुतांशी भागातील तापमानाने 40 अंशाचा आकडा ओलांडला आहे, अशातच हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही दिला आहे. सध्या, सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण तसेच रात्री उकाडा अशी हवामानाची सरमिसळ पुण्यात अनुभवायला मिळत आहे.
शहरात उन्हाचा पारा एप्रिल महिन्यातच वाढतच चालला आहे. शहराच्या अनेक भागात उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच ऊन तापत असून भरदुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. घराबाहेर पडल्यानंतर उन्हाचे चटके तीव्र जाणवू लागले आहेत. शहरात (दि.12) एप्रिललाच सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शहरातील कोरेगाव पार्क येथे सर्वांधिक 41.9 अंश तापमान नोंदविले गेले आहे. यावर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरातील पारा 40 अंशापर्यंत आल्याने मे महिन्यांत तो आणखी वाढण्याची शक्यता वेध शाळेकडून वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यांतच 40 अंशापुढे तापमान असणाऱ्या नागपूर, वर्धा, जळगाव, चंद्रपूर अशा जिल्ह्यांच्या यादीत यावेळी पुणे शहराचाही समावेश झाला आहे.
मध्यम पावसाची शक्यता
पुणे जिल्ह्यासह शहरात मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, त्यानंतर हवामान विभागाने पुन्हा पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह आणि 30 ते 40 कि.मी. प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विर्तविली आहे.
वाढते प्रदूषण बदलत्या हवामानास कारणीभूत ठरत आहे. यामध्ये हवेतील कार्बनडाय ऑक्साइडचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. हा वायू तापमान धरून ठवतो. शहरीकरणातून वाढलेले सिमेंटीकरणही त्यातीलच एक भाग आहे. पूर्व शहरात एक सलग पाऊस होत होता, आता शहर तसेच उपनगरातील भागात हवेच्या दाबाचे पट्टे तयार होतील तसा पाऊस पडत असतो, यामुळेच शहराबाहेर पाऊस असेल तर पेठांमध्ये मात्र कडक ऊन असते हा हवामानातील मोठा बदल सध्या आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो आहे.
– डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे