मुंबई – कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागले. या भयाण परिस्थितीचा सामना करताना अनेकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. याच परिस्थितीचे भयान वास्तव लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ‘अनलॉक जिंदगी’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
या ट्रेलरमध्ये एक स्वार्थी व्यावसायिक, फ्रँटलाईन वर्कर, त्याची बायको, गृहिणी यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. या ट्रेलरमध्ये माणुसकीचा खरा चेहरा समोर आणणारी अनेक दृश्ये दिसत आहेत. कठीण प्रसंगात रक्ताची नाती मदतीला येत नाही, मात्र अनोळखी लोक खरी मदत करतात. हे वास्तव या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. जे कोरोना काळामध्ये अनेक लोकांनी अनुभवले देखील होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते राजेश गुप्ता हे आहेत. याशिवाय क्थेचे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांनी केले आहे. या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता हे आहेत. येत्या 19 मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.