चिंबळी – श्रीक्षेत्र कोयाळी भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविकांनी देव-दानव युद्धाचा असा थरार अनुभवला. श्री भानोबा देवाच्या उत्सावा निमित्त कोयाळी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा सण भानोबा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो पुर्वी शिवभक्त श्री भानोबा देवाला तस्करांनी कपट करून मारले होते. एक दिवस माझ्यासाठी ही तुम्हाला मरावे लागेल असा शाप त्यावेळी भानोबाने तस्करांना दिली होता, त्यामुळे भानोबा देवाच्या शापानुसार तस्करांना आजही देवाशी युद्ध करावे लागत असल्याची आख्यायिका आहे.
श्री भानोबाच्या स्वागतासाठी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी जय्यत तयारी करून मोठ्या उत्साहात देवाचे स्वागत केले रविवारी (दि. 5) व सोमवारी (दि. 6) देव दानावामध्ये रंगलेले हे युद्ध प्रत्यक्ष पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी दोन दिवसांत हजारो भाविकांनी कोयाळीत हजेरी लावली होती. तत्पूर्वी पहाटे श्री भानोबा देवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली त्यानंतर देवाचा पोवाडा सादर करण्यात आला.
सकाळी साडेअकरा ते एक देव-दानव युद्ध झाले. दोन दिवसांत 1484 भाविकांनी युद्धात सहभाग घेतला होता. भानोबा देवाची महाआरती घेऊन देवाच्या दर्शनासाठी सुरूवात केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर कुस्त्याचा जंगी आखाडा व सांस्कृतीक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते, उपसभापती सविता गव्हाणे, बाबा राक्षे, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.