शेअर निर्देशांक 4 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर
मुंबई – भारत-चीनदरम्यानचा तणाव कमी होऊ लागला आहे. करोनावर लस निर्माण होण्याची शक्यता वाढल्यामुळे शेअरबाजारात खरेदी होत आहे. परिणामी निर्देशांक चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत.
सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 465 अंकानी म्हणजे 1.29 टक्क्यांनी वाढून 36,487 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 156 अंकांनी वाढून 10,763 अंकांवर बंद झाला. छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे मिडकॅप व स्मॉलकॅप 1.6 टक्क्यांनी वाढले.
सोमवारी औषधी क्षेत्र वगळता बॅंकिंग, वाहन, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, रिअल्टी या क्षेत्रांचे निर्देशांक वाढले. जागतिक शेअरबाजारात खरेदीचे वातावरण होते. औद्योगिक देशांतील उत्पादन सुरू झाले आहे. भारतातील अर्थव्यवस्थेची आकडेवारी समाधानकारक आहे. पुन्हा एकदा उद्योगांना सवलती जाहीर होण्याची शक्यता आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग व सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढत असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. वाहन विक्रीही वाढू लागली आहे. वाहतूक सुरळीत सुरू झाली असल्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत.
महिंद्रा, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, एचडीएफसी बॅंक आणि टाटा स्टीलचे शेअर वधारले. मात्र, बजाज ऑटो, भारती एअरटेल या कंपन्यांचे शेअर मागे पडले. जागतिक क्रुड बाजारात आज क्रुडचे दर 1.43 टक्क्यांनी वाढून 43.42 डॉलर प्रति पिंप झाले. रुपयाचे मूल्य आज दोन पैशांनी घसरले.