बोस्टन (अमेरिका) – गुलामगिरीतून मुक्त केलेल्या गुलामाने तत्कालिन अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यापुढे गुडघे टेकलेल्या अवस्थेतील पुतळा हटवण्याचा निर्णय बोस्टनच्या आर्टस कमिशनने एकमताने घेतला आहे. “इमॅन्सिपेशन मेमोरियल’ (मुक्तीचे स्मारक) म्हणून प्रसिद्ध असलेला हा पुतळा “इमॅन्सिपेशन ग्रुप’ आणि “फ्रीडमॅन्स मेमोरियल’ नावाने प्रसिद्ध आहे. अमेरिकेमध्ये वर्णभेदविरोधी आंदोलन अधिकच पेटायला लागले आहे.
या पुतळ्यातून गुलामगिरीच्या जाचक दुष्ट प्रथेचे स्मरण होत असल्याने त्याविरोधात अनेक तक्रारी मिळायला लागल्या होत्या. हा पुतळा 1879 पासून बोस्टन कॉमन इथे उभा आहे. वॉशिंग्टनमधील पुतळ्याची ही प्रतिकृती आहे. तीन वर्षांपूर्वी वॉशिंग्टनमधील पुतळा हटवण्यात आला आहे. या पुतळ्याचा श्वेतवर्णीय शिल्पकार थॉमस बॅल यांचे बोस्टन हे मूळगाव असल्याने तेथे या पुतळ्याची प्रतिकृती उभारली गेली आहे.
या पुतळ्यातून अमेरिकेतून जरी गुलामगिरीची प्रथा समाप्तीचा संदेश दिला जात असला तरी कृष्णवर्णीय व्यक्तीने लिंकन यांच्यापुढे गुडघे टेकल्याचे अनेकांनी याला आक्षेप घेतला आहे. बोस्टनच्या नागरिकांनीही या पुतळ्याबाबत नापसंती व्यक्त केल्याचे बोस्टनचे महापौर मॅर्टी वॉल्श यांनी मंगळवारी सांगितले.
हा पुतळा हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 12 हजार जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यानुसार हा पुतळा हटवण्याचा निर्णय आर्टस कमिशनने एकमताने घेतला आहे. अद्याप पुतळा हटवण्याची तारीख निश्चित केली गेलेली नाही.